कोलकाता : मागील काही काळात भारतीय संघात बरेच बदल झाले आहेत. नव्या दमाचे खेळाडू संघात येत असल्याने फॉर्म बाहेर असलेल्या खेळाडूंना संघ व्यवस्थापन थेट बाहेरचा रस्ता दाखवत आहे. अशामध्ये जगातील अव्वल फलंदाज असणारा भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही फॉर्म नसल्याने टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यामुळे आता कोणाचचं संघातील स्थान शाश्वत म्हणता येणार नाही. अशातच संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) हाही खास फॉर्ममध्ये नसताना माजी दिग्गज ऑलराऊंडर कपिल देव (Kapil Dev) यांनी त्याच्याबद्दल एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.  

  


कपिल यांनी हार्दीकबद्दल बोलताना थेट त्याच्या संघातील भूमिकेवरच थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ''ऑलराऊंडर खेळाडूचं काम गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करणं असतं. पण हार्दीक सध्या गोलंदाजी करत नसल्याने त्याला ऑलराऊंडर कसं म्हणायचं? सध्या त्याला योग्य सराव करुन स्वत:ला वेळ देण्याची गरज आहे. त्यानेच तो पुन्हा गोलंदाजी करुन फॉर्ममध्ये परत येऊ शकतो.'' कपिल हे कोलकाता येथील रॉयल कोलकाता गोल्फ कोर्स येथे बोलत होते. कपिल देव यांना क्रिकेटसह गोल्फ खेळण्यातही रस असल्याने ते अनेकदा गोल्फ खेळताना दिसून येत असतात.


'आणखी सामने खेळण्याची गरज'


हार्दीकच्या फॉर्मबद्दल बोलताना कपिल म्हणाले, ''हार्दीक एक अप्रतिम आणि संघातील अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. पण गोलंदाजीत सुधार करण्याकरता त्याला आणखी सामने खेळण्याची गरज आहे. त्याने आणखी चांगली कामगिरी केल्यानंतर आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकतो.''


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha