Hardik Pandya : भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात हार्दिक पांड्यानं सिंहाचा वाटा उचलला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत हार्दिक पांड्याने टी20 विश्वचषक गाजवला. तीन आठवड्यापूर्वी हार्दिक पांड्याचं नाव जगात चर्चेत होतं. जो तो हार्दिकचं कौतुक करत होता. पण एकाच दिवसात हार्दिक पांड्याला दोन मोठे धक्के बसले आहेत. हार्दिक पांड्याच्या आयुष्यात वादळ आले, असं म्हटल्यास वावगं वाटू नये. कारण, हार्दिक पांड्याकडील उपकर्णधारपद तर गेलेच, पण संसारतही काडीमोड झाला. हार्दिक पांड्यासाठी सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून जोरदार बॅटिंग केली जात आहे. हार्दिक पांड्यासाठी आज खूप वाईट वाटतेय, अशी भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
टी20 चं उपकर्णधारपद गेले -
एकवेळ टी20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याला रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्याकडे टी20 संघाची धुरा दिली जाईल, याबाबत अनेकांना शंका नव्हती. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने भारतीय संघाची कमानही संभाळली. पण श्रीलंका दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची निवड झाली, तेव्हा हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार नव्हे तर उपकर्णधारही नसल्याचं समोर आले. रोहित शर्मानं टी20 क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर पुढचा कर्णधार कोण? याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यासाठी हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर होतं. पण फिटनेस आणि सातत्याचं कारण देत बीसीसीआयने हार्दिक पांड्याला डावलले. टी20 संघाची धुरा आता सूर्यकुमार यादव याच्याकडे गेली आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदही ठेवलं नाही. इतकेच काय तर वनडे संघातही हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले नाही.
संसारातही झाला काडीमोड Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce -
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघाची आज निवड झाली, पण कर्णधार म्हणून सूर्याची निवड करण्यात आली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाला बीसीसीआयने नाकारलं. हा हार्दिक पांड्याला पहिला धक्का बसला. हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये यामुळे संताप होताच. त्याशिवाय हार्दिक पांड्याच्या परिस्थितीबद्दल अनेकांना वाईट वाटत होतं. यातून सावरत नाही, तोच हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यातील घटस्फोटाची बातमी समोर आली. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट करत वेगळं होतं असल्याची माहिती दिली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या नात्यामध्ये सहा महिन्यापासून दुरावा होता. आयपीएलदरम्यान हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाच्या चर्चेनं जोर धरला होता. आज हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वेगळं होतं असल्याचं अधिकृत जाहीर केले. त्याशिवाय आपल्या प्रायव्हेसीचा सन्मान करावा, या या संवेदनशील आणि कठीण काळात तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा, असल्याचं हार्दिक पांड्यानं पोस्टमध्ये म्हटलेय.
हार्दिकसाठी नेटकऱ्यांची बॅटिंग -
आयपीएल 2024 दरम्यान हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याच्यासमोर छपरी म्हणून हिनवलं गेलं. वैवाहिक आयुष्यात वादळ आलं असतानाही हार्दिक पांड्या त्यावेळी उभा राहिला. टीकाकारांना त्यानं विश्वचषकात प्रत्युत्तर दिलं. हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळी करत भारताच्या टी20 विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलला. हार्दिकच्या कामगिरीनंतर सोशल मीडियात त्याच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे आले. पण अवघ्या तीन आठवड्यात आपल्यापासून सर्वकाही हिरावल्याची भावना हार्दिक पांड्याच्या मनात असेल. हार्दिक पांड्यासाठी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भूमिका मांडली आहे. हार्दिक पांड्यासाठी खूप वाईट वाटत असल्याची भूमिका अनेकांनी घेतली आहे.
आणखी वाचा :
हार्दिक-नताशाचा घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट