Suryakumar Yadav : भारताच्या टी20 सामन्यांसाठीच्या संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. मुंबईच्या सूर्यकुमार यादवची भारताच्या टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यातल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला डावलून भारतीय संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यातल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईचाच रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. पण टी20 आणि वन डे या दोन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी (Team India Squad Announced for Sri Lanka Tour) शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पंड्याचा भारताच्या टी20 संघात समावेश असला तरी त्याला वन डे सामन्यांसाठीच्या संघातून वगळण्यात आलं आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादव याला टी20 संघाचं कर्णधारपद का आणि कसे मिळाले? याबाबत चर्चा सुरु आहेत.
गौतम गंभीर याला भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून नियुक्त करण्यात आले, तेव्हाच सूर्यकुमार यादवचं टी20 संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यातीत हार्दिक पांड्याच्या एकदोन पावले पुढे आले. यातं मुख्य कारण म्हणजे, गौतम गंभीर हा जेव्हा कोलकात्याचा कर्णधार होता, तेव्हापासून सूर्यकुमार यादवला सातत्याने फेवर केले. सूर्यकुमार यादवचं गुणवत्ता सर्वात आधी गौतम गंभीरने ओळखली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय कॅप नव्हती. तरीही त्यानं सूर्याला उपकर्णधारपद दिले होते. सूर्याला स्काय हे टोपणनाव सर्वात आधी गौतम गंभीरनेच दिले.
गौतम गंभीर सूर्यकुमार यादव याच्याकडे मानसपुत्राकडे पाहतो. जेव्हा गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य कोच झाला, तेव्हा हार्दिक पांड्या टी20 संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यातीतून मागे पडलाय. हार्दिक पांड्याकडे सर्व होतं. हार्दिक पांड्याने आपल्या आयपीएल संघाला दोन वेळा फायनलला घेऊन गेला, त्यामध्ये एकवेळा जेतेपद आणि एकवेळा उपविजेतेपद मिळालं. पण मुंबईचं नेतृत्व करताना गेल्या मोसमात हार स्विकारावी लागली. मुंबई दहाव्या क्रमांकावर रोहिली होती. पण याच हार्दिक पांड्याने नुकत्याच झालेल्या टी20 20 विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. खऱ्या अर्थाने हार्दिक पांड्या कर्णधारपदाचा दावेदार होता. यात कुठलीही शंका नाही. पण 2007 मध्ये जेव्हा युवराज सिंह आणि वीरेंद्र सेहवाग यांचा दावा फेटाळून धोनीला कर्णधार करण्यात आले.तसेच काहीसे चित्र आता झालेय. यासाठी हार्दिक पांड्याची फिटनेसकडे बोट दाखवण्यात येतेय. सूर्याच्या नेतृत्वाला गौतम गंभीरची पसंती असेलच. पण हार्दिक पांड्या याची फिटनेस हा सातत्यानं पाहायला मिळत नाही. त्याचा वर्कलोड, फिटनेसचा ताण.. यामुळे त्याला वारंवार अधूनमधून विश्रांती द्यावी लागते. कर्णधाराला विश्रांती देऊन चालू शकत नाही. कर्णधार हा सातत्याने मैदानात असावा लागतो. आपल्या संघाला प्रेरणा, प्रोत्साहन द्यावं, हे कर्णधाराकडून अपेक्षित असते. त्यामुळेच गौतम गंभीरचा सल्ला बीसीसीआय आणि निवड समितीने मानला असल्याचं आजच्या निवडीवरुन दिसतेय.
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
टी20 मालिकेचं वेळापत्रक, कधी होणार सामने?-
पहिला टी20 सामना - शनिवार, 27 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
दुसरा टी20 सामना - रविवार, 28 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
तिसरा टी20 सामना - मंगळवार, 30 जुलै 2024, रात्री सात वाजता, पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम