मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्याची चर्चा होती नेमकी तीच घटना आता घडली आहे. क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिकने अखेर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय (Hardik Pandya Natasa Stankovic Divorce)  घेतला. हा काळ आमच्यासाठी कठीण आहे, या संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घ्याल अशी अपेक्षा या हार्दिक आणि नताशाने केली. एकमेकांपासून विभक्त जरी झालो असलो तरी आमच्या मुलाच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी आम्ही दोघेही सर्वस्व देऊ असंही या दोघांनी म्हटलं आहे. या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हा निर्णय जाहीर केला आहे. 


हार्दिक-नताशाची घटस्फोटाची पोस्ट जशीच्या तशी


चार वर्षांच्या संसारानंतर नताशा आणि मी, दोघांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनीही एकत्रित खूप चांगला काळ घालवला, दोघांनीही एकमेकांना सर्वस्व दिलं. आमच्या जीवनातील हा एक चांगला काळ होता. एकमेकांचा आदर केला, आनंद दिला आणि एकमेकांना चांगली सोबत दिली... आता वेगळं होण्याचा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप अवघड होतं. 


आमच्या जीवनात आलेला आमचा मुलगा अगस्त्या... आमच्या दोघांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असेल आणि सह-पालक म्हणून आम्ही त्याच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी सर्वस्व देऊ. याक्षणी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. अशा या अवघड आणि संवेदनशिल काळात आम्हाला प्रायव्हसी मिळावी, आम्हाला सर्वांनी समजून घ्यावी ही विनंती करतो.


 






हार्दिक आणि नताशाचा विवाह 31 मे 2020 रोजी झाला होता. त्याच वर्षी त्यांना अगस्त्या हा मुलगाही झाला. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. त्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात येत होत्या. आता त्यावर या दोघांनीही शिक्कामोर्तब केलं आहे. 


हार्दिकचा बॅडपॅच


आयपीएल 2024 पासून, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यापासून हार्दिक पांड्या बॅडपॅचमधून जात होता. एकीकडे त्याची मैदानावरील वैयक्तिक कामगिरी ढासळत होती, फिटनेसची समस्या होती, तर दुसरीकडे त्याचे आणि नताशामधील मतभेद समोर येत होते. पण टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने महत्वपूर्ण कामगिरी केली आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून आलेले अश्रू सर्वांनीच पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून आपण वाईट टप्प्यातून जात होतो असं सांगत हार्दिकने त्यावेळी त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 


ही बातमी वाचा: