Gautam Gambhir BCCI: गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या मंगळवारी गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गंभीरकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. राहुल द्रविडसोबतच त्याच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ अर्थात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचाही कार्यकाळ संपला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.


क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकासाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांच्या नावाची चर्चा होती. तसेच याबाबत गौतम गंभीरने फोनवरुन त्यांच्यासोबत चर्चा देखील केल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी कायम ठेवले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक बदलले जाणे निश्चित आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला आपला सपोर्ट स्टाफ निवडण्याचा अधिकार दिला असला गौतम गंभीरच्या निर्णयावर बीसीसीआय सहमत नसल्याचे दिसून येत आहे. गौतम गंभीरला विनय कुमारची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निवड करायची होती. परंतु बीसीसीआयने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.  


सर्व सपोर्ट स्टाफ भारतीय?


क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकासाठी जॉन्टी रोड्सच्या नावाबाबत चर्चा झाली होती. सर्व सपोर्ट स्टाफ सदस्य भारतीय असतील, असं निर्णय बीसीसीआयने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टी दिलीप यांना पुन्हा संधी मिळणार आहे. गंभीरच्या सपोर्ट स्टाफबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता गंभीरसोबत सपोर्ट स्टाफमध्ये कोण दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


सपोर्ट स्टाफसाठीही लवकरच अर्ज मागवणार -


बीसीसीआय लवकरच सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवणार आहे. टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील फक्त टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत टीम इंडियासोबत होते. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.


गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?


भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर  जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल. 


संबंधित बातमी:


आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?