ICC Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने तयारी देखील सुरु केली आहे. मात्र याआधी बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला आहे.
पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे. 1996 च्या विश्वचषकानंतरची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाला आयसीसीने देखील मंजुरी दिली आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने आयसीसी आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वसीम अक्रम काय म्हणाला?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारत पाकिस्तानात नक्कीच येईल, असा विश्वास पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमने व्यक्त केला आहे. मला आशा आहे की भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येईल. संपूर्ण देश इतर सर्व संघांच्या यजमानपदासाठी उत्सुक आहे आणि भारतीय संघाचे भव्य स्वागत केले जाईल, असंही वसीम अक्रम यांनी सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी मैदान सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये स्टेडियमचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती देखील वसीम अक्रम यांनी यावेळी दिली.
टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार-
बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघटना सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला असता. 2023 एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान देश सोडून इतर आयसीसी क्रमावारीतल अव्वल 7 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरल्या असत्या. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.
संबंधित बातमी:
आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?