Indian Cricket Team Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरला (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) म्हणून निवड करण्यात आली आहे.  बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.


गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर आता टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर याची टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर टी. दिलीप टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 






अभिषेक नायर-गौतम गंभीरने केकेआरमध्ये बजावलेली मोठी भूमिका-


गौतम गंभीर हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार राहिला आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं. मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने त्याची नियुक्ती मार्गदर्शक म्हणून केली होती. त्याच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं. यावेळी अभिषेक नायर केकेआरचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. त्यामुळे अभिषेक नायरची टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यास हा केकेआरला दुहेरी धक्का असेल, अशी चर्चा रंगली आहे.


सपोर्ट स्टाफसाठीही लवकरच अर्ज मागवणार -


बीसीसीआय लवकरच सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवणार आहे. टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील फक्त टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत टीम इंडियासोबत होते. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.


गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?


भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर  जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल. 


संबंधित बातम्या:


Gautam GambhirL गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होताच 5 खेळाडूंचं नशीब चमकणार?; टीम इंडियात आता स्थान पटकवण्याची शक्यता


Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिली गुड न्यूज, लवकरच लग्नबंधनात अडकणार, म्हणाला, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत...


'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान