Eng vs Ind 4th Test : मँचेस्टर कसोटीत 'वॉरियर' ऋषभ पंतवर लागले गंभीर आरोप; इंग्लंडच्या दिग्गजाचं जोरदार टीकास्त्र, काय म्हणाला? जाणून घ्या
Rishabh Pant Injury Update : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला मँचेस्टर कसोटीतही सतत संघर्ष करावा लागला.

England vs India 4th Test Update : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला मँचेस्टर कसोटीतही सतत संघर्ष करावा लागला. कसोटी मालिकेतील या चौथ्या सामन्यात, जिथे सुरुवातीला फलंदाजांनी निराश केले, तिथे गोलंदाजांनाही सहज यश मिळाले नाही. पण टीम इंडियाला केवळ कामगिरीच्या बाबतीत अडचणींना तोंड द्यावे लागले नाही, तर या सामन्याच्या 3 दिवसांत खेळाडूंनाही दुखापत होत आहे. यामुळे काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे आणि मालिकेत मागे पडल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या टीम इंडियाचा ताण आणखी वाढला.
पहिल्या दिवशी ऋषभ पंतला दुखापत
मँचेस्टर कसोटीची सुरुवात टीम इंडियासाठी दुखापतीने झाली. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात, स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतला पायाला दुखापत झाली. क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करताना पंतच्या पायला दुखापत झाली. नंतर असे उघड झाले की त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले आहे आणि तो 6 आठवड्यांसाठी मैदानाबाहेर राहणार आहे. दुखापती असूनही पंत फलंदाजी करण्यासाठी परतला आणि अर्धशतक झळकावले, परंतु यामुळे भारतीय संघाची ताकद कमी झाली.
ऋषभ पंत जिद्दीने दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यामुळे त्याचे कौतुक होत होतं आणि त्याला ‘वॉरियर’ म्हणजे योद्धा असंही म्हणण्यात आलं. मात्र, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेविड लॉयड यांनी पंतवर गंभीर आरोप करत त्याच्या दुखापतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टॉकस्पोर्टवरील चर्चेत लॉयड म्हणाले, "मी आज लीजेंड्स लाउंजमध्ये होतो आणि तिथे अनेक लोकांचं एकमत होतं की ऋषभ पंत जाणीवपूर्वक दुखापतीचं नाटक करत आहेत. त्याची दुखापत इतकी गंभीर वाटत नाही. तो जेव्हा पायर्या उतरला, तेव्हा त्याने अंगठा धरून दुखापत अधिक मोठी दाखवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तर पंतला 'टाइम आउट' द्यावा अशी सूचनाही केली."
ICC च्या नियमावरही टीका
पंतवर टीका करताना लॉयड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) सब्स्टीट्यूट नियमांवरही नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केलं की तो 'रनर' (दुखापत झालेल्या फलंदाजासाठी दुसरा रनर खेळाडू) या संकल्पनेच्या विरोधात आहेत. मात्र, एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली असेल, तर त्याच्या जागी ‘लाइक-फॉर-लाइक’ म्हणजे समतोल पर्याय असलेला बदली खेळाडू देता यावा, असंही त्यांनी सुचवलं.
लॉयड म्हणाले, "सध्याच्या नियमांमध्ये अनेक त्रुटी आहेत. पण जर एखाद्या खेळाडूला खरंच गंभीर दुखापत झाली असेल, तर त्याला योग्य असा बदली खेळाडू द्यायला हवा. मात्र हे असंही नसावं की फलंदाजाच्या जागी एखादा फिरकीपटू खेळवावा लागेल."





















