वडील भारताकडून क्रिकेट खेळले, आता मुलगा इंग्लंडच्या संघात; कोण आहे हॅरी सिंग?
Harry Singh 12th Man England vs Sri Lanka: भारतीय वंशाचा खेळाडू हॅरी सिंग सध्या इंग्लंडच्या संघात 12 वा खेळाडू म्हणून खेळत आहे.
Harry Singh 12th Man England vs Sri Lanka: श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून उभय संघात 21 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 236 धावांवर सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 6 विकेट्स गमावत 259 धावांवर पोहचला आहे. याचदरम्यान इंग्लंडच्या संघातील एका खेळाडूची सध्या भारतात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचं नाव आहे हॅरी सिंग.
भारतीय वंशाचा खेळाडू हॅरी सिंग (Harry Singh) सध्या इंग्लंडच्या संघात 12 वा खेळाडू म्हणून खेळत आहे. हॅरी सिंग अवघ्या 20 वर्षांचा असून श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हॅरी ब्रूक काही कारणास्तव मैदानाबाहेर गेला तेव्हा हॅरी सिंग क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. हॅरी सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रुद्र प्रताप सिंग यांचा मुलगा आहे. वडील रुद्र प्रताप सिंग भारतीय क्रिकेट संघातून खेळले असताना हॅरी सिंग इंग्लंडच्या संघात कसा पोहचला, असे सवाल सध्या उपस्थित होत आहे.
कोण आहे रुद्र प्रताप सिंग?
हॅरीचे वडील रुद्र प्रताप सिंग 1980 च्या दशकात भारताकडून क्रिकेट खेळले होते. रुद्र प्रताप सिंग हे भारतासाठी फक्त 2 एकदिवसीय सामने खेळू शकले, ज्यामध्ये त्यांनी फक्त एक विकेट घेतली. मात्र 59 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांच्या नावावर 150 विकेट्स आहेत. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 1,413 धावा केल्या आहेत आणि शतकी खेळी खेळताना 141 धावाही केल्या होत्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रुद्र प्रताप सिंग यांनी कोचिंगला सुरुवात केली. ते इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) मध्ये सामील झाले आणि लँकेशायर काउंटी संघाला प्रशिक्षण देऊ लागले. 1990 च्या दशकात रुद्र प्रताप सिंग इंग्लंडला वास्तव्यास गेले आणि त्याच दरम्यान 2004 मध्ये त्यांच्या घरी हॅरी सिंगचा जन्म झाला.
हॅरी सिंगचे जुलैमध्ये लँकेशायरसाठी पदार्पण-
हॅरी सिंगने या वर्षीच्या जुलैमध्ये लँकेशायरसाठी पदार्पण केले. 2024 वनडे कपमध्ये त्याने सर्व 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी देखील केली. हॅरीने 2022 मध्ये इंग्लंडच्या अंडर-19 संघात स्थान मिळवले होते. त्याला लँकेशायरसाठी सलामीची संधीही मिळाली. हॅरीने 7 सामन्यात 87 धावा केल्या आणि गोलंदाजीत 2 विकेट्स घेतल्या.
सामन्याची काय स्थिती?
हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांच्या झुंजार अर्थशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध दुसन्या दिवशी प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन केले. ब्रुकने 73 चेंडूंत 4 चौकारांसह 56 धावा केल्या. स्मिथने 97 चेंडूत 5 चौकार व एका षट्कारासह नाबाद 72 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 61 षटकांत 6 बाद 259 धावा करत 23 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेच्या असिथा फर्नाडोने 68 धावांत 3 बळी घेतले. श्रीलंकेला पहिल्या दिवशी 236 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडचा डाव चांगल्या सुरुवातीनंतरही 3 बाद 67 धावा असा गडगडला. येथून ब्रूकने जो रुटसह चौथ्या गड्यासाठी 68 चेंडूंत 58, तर स्मिथसोबत पाचव्या गड्यासाठी 83 चेंडूंत 62 धावांची भागीदारी केली. यामुळे इंग्लंडला पुनरागमन करता आले. रुटने 57 चेंडूंत 4 चौकारांसह 42 धावा केल्या. स्मिथने ख्रिस वोक्ससोबत (25) सहाव्या गड्यासाठी 110 चेंडूंत 52 धावांची भागीदारी केली.
संबंधित बातमी:
इशान किशनपासून श्रेयस अय्यरपर्यंत...; टीम इंडियाचे खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार!