IND vs SA : भारत (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 7 विकेट्सने पराभव झाला. ज्यामुळे या सामन्यासह मालिकाही भारताच्या हातातून निसटली. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान दोन्ही सामन्यात भारताकडून सुमार गोलंदाजी आणि फलंदाजीचं दर्शन घडलं, त्यामुळे सर्व स्तरातून भारताच्या या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे. काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही याबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहे.


झहीर खान म्हणतो चूका सुधारा!


माजी स्टार गोलंदाज झहीर खानने भारतीय संघाला त्यांच्या चूका सुधारण्याचा सल्ला दिला आहे. तसंच संघाने मालिका गमावल्यामुळे तिसरा सामना अधिक कठीण असेल असंही तो म्हणाला. कर्णधार केएल राहुलला फील्ड लावण्यापासून इतरही गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. झहीर म्हणाला, मालिका गमावल्यामुळे संघ तणावात असल्याने कर्णधाराने संघाला आधार दिला पाहिजे. 


सुनील गावस्करही निराश


महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी भारतीय टीमच्या खराब प्रदर्शनावर नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले, 'मॅनेजमेंटने 2023 विश्वचषकाचा विचार करुन संघ तयार करायला हवा. स्पर्धेला अजून 17 ते 18 महिने शिल्लक आहेत, त्यामुळे अधिक खेळाडूंना संधी द्यायला हवी. तसंच भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चाहरला संधी द्यायला हवी.'


हरभजनचा कोहलीला सल्ला


काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या हरभजन सिंग यानेही दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. त्याच्य मते कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघात स्थान मिळण्यासाठी चांगली कामगिरी करायला हवी. आधी कर्णधार असल्याने संघात स्थानाची कोणतीही चिंता नव्हती पण आता उत्तम प्रदर्शन करणं गरजेचं आहे, असं हरभजन म्हणाला. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha