IND Vs SA, 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा सात विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 288  धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केलं. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे कसोटीनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही गमावली. 


288  धावांचा बचाव करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत विजय मिळवला. जानेमान मलान आणि क्विंटन डि कॉक यांनी दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली. जानेमान मलानने 91 तर क्विंटन डि कॉकने 78 धावांची खेळी केली. त्याशिवाय बवूमाने 35, डुसेनने 37 आणि मार्करमने 37 धावांची खेळी केली. भारताकडून बुमराह, शार्दुल आणि चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  


दरम्यान, भारतीय कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, पहिल्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला होता.  शिखर धवन आणि राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या दहा षटकांत भारतीय संघाने 58 धावा चोपल्या होत्या. पण त्यानंतर शिखऱ आणि विराट कोहली यांनी लागोपाठ विकेट फेकल्या. त्यानंतर ऋषभ पंतने तडकाफडकी फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. पंतने 71 चेंडूत 85 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पंतने 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. पंतशिवाय कर्णधार के. एल राहुलने संयमी फलंदाजी केली. राहुलने 79 चेंडूचा सामना करत 55 धावा केल्या. राहुलने मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. मैदानावर स्थिर झाल्यानंतर राहुल धावांचा पाऊस पडेल असे वाटत होतं, तेव्हाच राहुल बाद झाला. राहुलनंतर पंतही लगेच माघारी परतला. अय्यरलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारतीय संघ 250 धावांपर्यंत जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुल ठाकूर धावून आला. शार्दुलने अश्विनसोबत भारतीय संघाची धावसंख्या 287 पर्यंत पोहचवली. शार्दुल ठाकूरने 40 धावांची खेळी केली. तर अश्विनने 25 धावांची खेळी केली. पंत आणि राहुल यांच्या शतकी भागिदारीच्या बळावर भारतीय संघाने 287 धावा केल्या. माजी कर्णधार विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. शिखर धवनने 29 धावांची छोटेखानी खेळी केली.  दक्षिण आफ्रिकाकडून Tabraiz Shamsi ने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर मागला, मार्करम,  केशव महाराज आणि Phehlukwayo यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली आहे.