IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या (23 जानेवारी) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. पहिले दोन सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत  2-0 अशी आघाडी घेतलीय. तसेच शेवटचा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केलीय. अखेरच्या सामन्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.


न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंडवरील विजयी आकडेवारी
न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंडवर (NCG) आतापर्यंत 44 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 29 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला 15 सामन्यांमध्ये यश मिळवता आलंय. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या मैदानावर अधिक फायदा मिळतो.


सरासरी धावसंख्या
न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 234 आहे. तर, दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 186 आहे. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेविरुद्ध 367 धावा केल्या होत्या. या मैदानावर प्रथम गोलंदाजी करून जिंकणाऱ्या संघाची सर्वाधिक धावसंख्या 259 इतकी आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करून 300 करणाऱ्या संघाची विजयाची शक्यता अधिक आहे. 


या मैदानावरील भारताची कामगिरी 
भारतानं न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर आतापर्यंत 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तीन सामने जिंकले आहेत. तर, दोन सामने गमावले आहेत. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा विक्रम खूप चांगलाय. दक्षिण आफ्रिकानं या मैदानावर 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यातील 31 सामने जिंकले आहेत आणि केवळ 6 सामन्यात त्यांना अपयश आलंय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha