IND W vs ENG W : इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय महिला संघाला पाच विकेट्सनी पराभवाला सामोरं जावं लागलं. याचसोबत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने मालिकाही गमावली आहे. भारतीय संघाने दिलेल्या 221 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या महिला संघाने ते आव्हान पाच खेळाडूंच्या बदल्यात 47.3 षटकातच पार केलं.
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात काहीशी खराब झाली. चौथ्या विकेटसाठी मिताली राज आणि हरमनप्रित कौर यांनी 68 धावांची भागिदारी केली आणि टीम इंडियाचा डाव सावरला. यावेळी मिताली राजने आपल्या करियरमधील 57 वे अर्धशतक झळकावलं. तिने 92 चेंडूंचा सामना करत 59 धावांची खेळी केली. त्यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त शेफाली वर्माने 55 चेंडूत 44 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताने 221 धावांपर्यंत मजल मारली.
टीम इंडियाच्या आव्हानाचा पाठलाग करत मैदानात उतरलेल्या इंग्लडच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. पण सोफिया डंकलीच्या 81 चेडूमधील 73 धावा, लॉरेन विनफिल्डच्या 42 धावा आणि कॅथरिन ब्रंटच्या नाबाद 33 धावांच्या बदल्यात इंग्लंडने हे आव्हान 47.3 षटकांत पार केलं.
तीन सामन्यांच्या या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागल्याने टीम इंडियाने मालिकाही गमावली आहे. पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 8 विकेट्सनी पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2021 : संत तुकोबा आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज प्रातिनिधिक प्रस्थान
- National Doctors' Day 2021 : कोरोना संक्रमणाच्या काळात आज साजरा केला जातोय 'डॉक्टर्स डे', जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
- Online Gaming Fraud : ऑनलाईन गेमिंग व्यवसायाच्या नावावर शेकडो गुंतवणूकदारांना गंडा; नागपुरातील धक्कादायक प्रकार