नागपूर : लॉकडाऊनच्या काळात घरात बसलेल्या लोकांनी ऑनलाईन गेमिंगचा सर्वाधिक आस्वाद घेतला आहे. कोरोनाकाळाच लोकांना विरंगुळ्याचं साधन काहीचं नव्हतं. त्यामुळे लोकं ऑनलाईन गेमिंगकडे वळली. मोबाईलवर ऑनलाईन लुडो, कॅरम, क्रिकेट, तीन पत्ती यांसारखे विविध गेम खेळणाऱ्यांची संख्या अचानकच वाढली. याचाच फायदा घेत नागपुरातील एका भामट्याने ऑनलाईन गेमिंगच्या व्यवसायाच्या नावावर शेकडो गुंतवणूकदारांचे खिसे रिकामे करत कोट्यवधी रुपये लाटले आहेत.


"इ गेम्स एशिया ऑनलाईन" या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागपुरसह देशातील शेकडो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे फसवणूक करणारा सुदत्ता रामटेके हा स्वतः नागपूरचा नावाजलेला लँड डेव्हलपर आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर सुदत्ताचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय गोत्यात आला. त्यामुळे त्याने लोकेश वाघमारे नावाच्या पार्टनरसह त्याने ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय सुरु केला. "इ गेम्स एशिया ऑनलाईन" या गेमिंग प्लॅटफॉर्मवर घरात बसलेले लोकं ऑनलाईन लुडो, कॅरम, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, आईस हॉकी, टेबल पूल, तीन पत्ती असे एकूण 18 गेम्स खेळायचे. लोकांनी या गेम्ससाठी लावलेल्या पैशातून कंपनीला भरघोस नफा मिळून कंपनीत पैसे गुंतविणाऱ्यांची रक्कम एका वर्षात दुप्पट होईल असे आमिष त्याने दाखविले. नागपुरातील काही डॉक्टर्स, उद्योजकांना या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी या सुदत्ताने तयार केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची कोट्यवधीची रक्कम घेऊन सुदत्ता आणि त्याचा साथीदार लोकेश वाघमारे नागपुरातून फरार झाले. अनेक दिवस दोघांचा शोध घेतल्यानंतर फसवणूक झालेल्या काही गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला.     


सुदत्ता रामटेके आणि त्याच्या साथीदाराने कमी वेळेत जास्त गुतवणूकदारांकडून जास्त पैसा गोळा करण्याच्या उद्दीष्टाने गुंतवणुकीची चेन सिस्टिम ठेवली होती. म्हणजेच एका गुंतवणूकदाराने आणखी काही गुंतवणूकदार आणले तर त्यांना जास्त नफा असे आकर्षक प्रस्ताव ही लोकांसमोर ठेवले होते. त्याने गुंतवणूकदारांना अगदी काही हजारांपासून अनेक लाखांची गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. सुरुवातील काही जणांना आकर्षक परतावे देऊन त्याने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित केला. डिसेंबर 2020 नंतर त्याने लोकांना परतावे देणे बंद केले. मात्र, तोवर नागपूरसह देशभरातील शेकडो गुंतवणूकदारांनी अनेक कोटींची गुंतवणूक सुदत्ताच्या हाती सोपविली होती. ती घेऊन मार्च 2021 मध्ये सुदत्ता आणि त्याचे सहकारी नागपुरातून पसार झाले. तब्बल चार महिन्यांच्या शोधानंतर पोलिसांनी त्यांना गोव्यातून अटक केली आहे.


आतापर्यंत नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत 14 जणांनी या प्रकरणी तक्रार नोंदविली असून 250 पेक्षा जास्त गुंतवणूकदार तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय लाखांचा नफा देईल अशी थाप मारून सुदत्ता आणि त्याच्या टीमने अनेक लोकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. जसे जसे तक्रारकर्ते वाढत जातील तसा फसवणुकीचा आकडा आणखी वाढेल असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आधीच वारंवार लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे विविध व्यवसाय, नोकऱ्या धोक्यात आलेल्या असताना अशा कोणत्याही भामट्याने सांगितलेल्या गुंतवणुकीच्या योजनेत आपली मेहनतीची कमाई गमावू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.