England vs West Indies | चार महिन्यांनी क्रिकेटपटू मैदानात मात्र चिअर करण्यासाठी प्रेक्षक नाहीत!
कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या महामारीमुळे 15 मार्च 2020 पासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झालं होतं. परंतु इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु होत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
लंडन : इंग्लंड आणि वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आज (8 जुलै) जेव्हा मैदानात उतरतील तो क्षण ऐतिहासिक असेल. कारण सुमारे चार महिन्यानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होत आहे. 8 जुलै 2020 पासून सुरु होणाऱ्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना प्रत्येक दृष्टीने वेगळा असेल. सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेटपटू मैदानात असले तरी त्यांना चिअर करण्यासाठी प्रेक्षक मात्र स्टेडियममध्ये नसतील. कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. साऊदम्पटनमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे.
मर्यादित षटकांचं क्रिकेट प्रचलित झाल्यानंतर, मागील 46 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा 100 पेक्षा जास्त दिवस कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवलेला नाही. कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या महामारीमुळे 15 मार्च 2020 पासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झालं होतं. आता जैव सुरक्षित वातावरणात रिकाम्या स्टेडियममध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात होत आहे. याआधी अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनीमध्ये खेळवण्यात आला होता.
सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कच्या माहितीनुसार, भारतात या मालिकेचं थेट प्रक्षेपण आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सोनी सिक्सच्या चॅनल्सवर केलं जाईल. ही मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाई. क्रिकेट चाहतेही या मालिकेची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासह या बदलांचं परीक्षण होईल.
मैदानावर कोणते नियम पाळावे लागणार? - रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉयचं काम करणार - स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेणार - पीपीई किट घालून पत्रकार आणि फोटोग्राफर्स मॅच कव्हर करणार - केवळ दोन्ही संघाचे कर्णधार आणि सामनाधिकारी नाणेफेकीसाठी बाहेर जाणार - नाणेफेकीदरम्यान कोणताही कॅमेरा नसेल किंवा शेकहॅण्डही केलं जाणार नाही - पंच स्वत:च्या बेल्स घेऊन मैदानात जातील - खेळाडू एकमेकांचे ग्लोव्ज, शर्ट, पाण्याची बाटली, बॅग किंवा स्वेटर वापरु शकणार नाहीत - ग्राऊंड स्फाफ मैदानावर खेळाडूंच्या 20 मीटरच्या कक्षेत जाणार नाही. इथे दोन चौरस फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं लागेल. - स्कोअरर पेन किंवा पेन्सिल शेअर करु शकणार नाही - आयसीसीने आधीच चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे. दोन इशाऱ्यानंतर पाच धावांचा दंड लावला जाईल. - जर षटकारानंतर चेंडू स्टॅण्डमध्ये गेला तर ग्लोव्ज घातलेले खेळाडूच तो फेकू शकतात. इतर कोणालाही चेंडूला हात लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत तिथले दरवाजे एका अॅपद्वारे उघडण्याची सोय आहे, ज्यात हॅण्डला हात लावण्याची गरज नाही. तसंच खेळाडूंना कोणतीही रुम सर्विस नसेल किंवा लिफ्टही नसेल.या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनवर नजर टाकूया...
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), जाक क्रॉली, जो डेनली, ओली पोप, डॉम सिबली, क्रिस वोक्स, मार्क वूड.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, एन बोनर, क्रेग ब्रेथवेट, शामराह ब्रुक्स, जॉन कँबेल, रॉस्टन चेज, रकीम कॉर्नवेल, शेन डाऊरिच (यष्टीरक्षक), शॅनन गॅब्रिएल, चेमर होल्डर, शाय होप, अलजारी जोसफ, रेमन रीफर, कीमर रोच.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिका वेळापत्रक
पहिली कसोटी - 8 जुलै ते 12 जुलै, साऊदम्पटन
दुसरी कसोटी - 16 जुलै ते 20 जुलै, मॅन्चेस्टर
तिसरी कसोटी - 24 जुलै ते 28 जुलै, मॅन्चेस्टर