INDvsENG : अश्विनने हरभजन सिंगची माफी मागितली, कारण...
कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने 29 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि सात वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यात एका डावात 59 धावा देत सात विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
INDvsENG : इंग्लंडविरुद्ध चेन्नईत सुरु असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार स्पिनर आर अश्विनने खास स्थान मिळवले आहे. अश्विनने हरभजन सिंगचा भारतातील एक विक्रम मोडला आहे. भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतल्यानंतर अश्विनने हरभजन सिंगची माफी मागितली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीच्या दुसर्या दिवशी बेन स्टोक्सला बाद करून अश्विनने हरभजनला मागे टाकले आहे. हरभजन सिंगने भारतात 28.76 च्या सरासरीने 265 विकेट घेतल्या आहेत. तर अश्विनने भारतात 266 विकेट घेतल्या आहेत.
अश्विन याबाबत म्हणाला की, जेव्हा 2001 मध्ये मी हरभजनला खेळताना पाहिले, तेव्हा मी ऑफस्पिनर म्हणून देशासाठी खेळेल असे मला वाटले नव्हते. मी त्यावेळी माझ्या राज्याकडून खेळत होतो आणि फलंदाजीमध्ये करिअर करण्याची इच्छा होती.
अनिल कुंबळे अव्वल स्थानी
आतापर्यंत शानदार गोलंदाजी करत 34 वर्षीय अश्विनने 76 कसोटी सामन्यांमध्ये 25.26 च्या सरासरीने 391 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनला या कामगिरीची माहिती नव्हती. सुरुवातीला माझे सहकारी खेळाडू माझी चेष्टा करायचे, कारण मी भज्जू पा सारखी गोलंदाजी करायचो. मात्र त्या परिस्थितीतून आल्यानंतर त्यांचाच विक्रम मोडणे ही अविश्वसनीय बाब आहे. मला त्याबद्दल माहिती नव्हती, पण आता जेव्हा मला त्याबद्दल कळतंय तर मी मी आनंदी आहे. माफ कर, भज्जू पा, असं अश्विनने म्हटलं.
कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने 29 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि सात वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यात एका डावात 59 धावा देत सात विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 140 धावा देत 13 विकेट ही त्यांची एका सामन्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. अश्विनने भारतात 22.67 च्या सरासरीने 266 विकेट घेतल्या आहेत. महान फिरकीपटू अनिल कुंबळेने 24.88 च्या सरासरीने 350 विकेट्स घेतल्या आहेत.