ENG-W vs IND-W Match : भारतीय महिला संघाची इंग्लंड विरुद्ध खराब सुरुवात, 24 षटकात सात बाद 86 धावा
इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाची खराब सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 24 षटकात सात बाद 86 धावा भारतीय महिला संघानं केल्या आहेत.
ENG-W vs IND-W Match : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलदांजी करत असून, सुरुवात डळमळीत झाली आहे. सध्या भारतीय महिला संघाने 24 षटकात सात विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. सध्या ऋचा घोष आणि झूलन गोस्वामी खेळत आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध दिमाखदार विजयामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला होता. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाची ही चौथी लढत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 155 धावांनी दणदणीत विजय मिळवणारा भारतीय संघ 4 गुणांनिशी (3 सामन्यांपैकी 2 विजय) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या इंग्लंडनंतरच्या सामन्यानंतर भारताची ऑस्ट्रेलिया संघाशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुणतालिकेतील अव्वल चार संघांमधील स्थान टिकवण्यासाठी भारताला हा विजय आवश्यक असणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध गमावलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी अतिशय धिम्या खेळाचं प्रदर्शन केलं होतं. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली होती. स्मृती मानधनाने 119 चेंडूंत 123 धावा केल्या होत्या. तर हरमनप्रीत कौरने 107 चेंडूंत 109 धावा केल्या होत्या. या बळावर भारतीय संघाने विश्वचषकातील आपली सर्वाधिक (8 बाद 317 धावा) धावसंख्या उभारली होती. 2017 च्या विश्वचषकानंतर हरमनप्रीतचे हे पहिलेच शतक आहे.
विश्वचषकाआधी झगडणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत तरी चांगली कामगिरी बजावली आहे. वेगवान गोलंदाज मेघना सिंग, पूजा आणि झुलन गोस्वामी यांनी टिच्चून गोलंदाजी केली आहे. याचप्रमाणे यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील राजेश्वरी गायकवाड (7 बळी) व स्नेह राणा (5 बळी) यांच्यावर फिरकीची मदार असणार आहे.