इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना कसोटीत धुतलं, एका दिवसात 506 धावा, 112 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
England Test Record: पाकिस्तानविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या संघाने (PAK vs ENG) विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
England Test Record: पाकिस्तानविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या संघाने (PAK vs ENG) विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंड संघाने एका दिवसात 506 धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंड संघाने 112 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतक झळकावली आहेत. रावळपिंडी येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने (PAK vs ENG) चार गड्यांच्या मोबदल्यात 506 धावांचा डोंगर उभारला आहे.
कोणत्या संघाने पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा केल्या -
कसोटी क्रिकेटमध्ये याआधी काही संघ एका दिवसात 500 धावांसख्येच्या जवळ पोहचले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने 1910 मध्ये सिडनी येथे दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटीच्या पहिल्या दिवशी 496 धावांचा पाऊस पाडला होता. 2012 मध्ये एडिलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 482 धावांचा पाऊस पाडला होता. 1934 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यातही विक्रमी धावसंख्या झाली होती. इंग्लंडने या सामन्यात एका दिवसात 475 धावांचा पाऊस पाडला होता. 1936 मध्ये इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांना धु धु धुतले होते. इंग्लंडच्या फलंदाजांनी एका दिवसात 471 धावांचा पाऊस पाडला होता. आज रावळपिंडी येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली. इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसाअखेर 506 धावांचा डोंगर उभारला.
पहिल्याच दिवशी इंग्लंडकडून चार शतके
कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतक झळकावली आहेत. यामध्ये सलामी फलंदाज जॅक क्राउली, बेन डकट, ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांचा समावेश आहे. सलामी फलंदाज जॅक क्राउली याने 111 चेंडूत 122 धावांची खेळी केली. दुसरा सलामी फलंदाज बेन डकट याने 110 चेंडूत 107 धावांचा पाऊस पाडला. विकेटकिपर फलंदाज ओली पोप याने 104 चेंडूत 108 धावा चोपल्या. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजासाठी आलेला हॅरी ब्रूक पहिल्या दिवसाअखेर 81 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. (PAK vs ENG)