(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs NZ: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडला नमवून इंग्लंड बनला 'चेज मास्टर'!
New Zealand Tour of England: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनं इंग्लंडसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
New Zealand Tour of England: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनं इंग्लंडसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. नवा कर्णधार आणि प्रशिक्षक आणि आक्रमक मानसिकता घेऊन इंग्लंडच्या संघानं या मालिकेला सुरुवात केली. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघानं लक्ष्याचा पाठलाग करताना सामने जिंकून इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये इंग्लंडनं 250 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे पार केलं. ज्यामुळं जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरलाय. 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडपूर्वी कोणत्याही संघानं मालिकेत तीन वेळा असा पराक्रम केला नव्हता.
लॉर्ड्स कसोटीत रूटची चमकदार कामगिरी
लॉर्ड्स क्रिकेटमैदानावर खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी 277 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात जो रूटच्या नाबाद 115 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघानं पाच विकेट्सनं हा सामना जिंकला होता. यादरम्यान त्याला कर्णधार बेन स्टोक्सने 54 धावांची शानदार खेळी खेळून साथ दिली होती.
नॉर्टिंघममध्ये घोंगावलं बेअरस्टो नावांचं वादळ
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नॉर्टिंघममध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोनं वादळी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत. या सामन्यात किवी संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी 299 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यातील अखेरच्या दिवशी न्यूझीलंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणं थोडं कठीण मानलं जात होतं. हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता क्रिकेट तज्ज्ञांनी वर्तवली. पण या सामन्यात इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोनं 92 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 136 धावांची तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
लीड्समध्येही रूट-बेअरस्टोची आश्चर्यकारक कामगिरी
अखेरच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघानं यजमानांसमोर विजयासाठी 296 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडची फलंदाजी पाहून संघ ही धावसंख्याही सहज गाठेल, अशी आशा सर्वांना वाटत होती. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत इंग्लंडनं हे लक्ष्य 54.2 षटकात पूर्ण केलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना रूटनं 86 धावा केल्या आणि बेअरस्टोने 44 चेंडूत 77 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान ओली पोपनंही 82 धावांचं योगदान दिलं.
हे देखील वाचा-
- Deepak Punia wins bronze medal: दीपक पुनियानं किर्गिझस्तानमध्ये तिरंगा फडकावला, सत्यबेल्डीला हरवून कांस्यपदक जिंकलं
- NZ vs IND: टी-20 विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंडचा दौरा करणार; कधी, कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
- Ind vs Eng, 5th Test : भारताविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; जेम्स अँडरसन संघात दाखल