Dinesh Karthik to ECB : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 416 धावांपर्यंत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला तो पंत आणि जाडेजा जोडीने. दोघांनी शतकं ठोकली असून पंतने पहिल्याच दिवशी केलेल्या 146 धावांनी सर्वांचीच मनं जिंकली. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मात्र पंतच्या खेळीपेक्षा त्याला बाद करत एका डावात केवळ एक विकेट घेणाऱ्या जो रुटला अधिक महत्त्व दिलं. त्यांनी तशी हेडलाईन केल्याने भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक नाराज झाला असून त्याने ट्वीट करत ईसीबीला सुनावलं आहे.


पंत सामन्यात 111 चेंडूत 146 धावांची खेळी केली. यामध्ये 20 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. पण पहिल्या दिवशीच खेळ संपल्यावर ईसीबीने पंतला अधिक महत्त्व न देता, 'जो रुटने प्रभावी पंतला बाद केलं' अशा प्रकारची हेडलाईन केली. ज्याबाबत नाराजी व्यक्त करत कार्तिकने या हेडलाईनचा फोटो टाकत ट्वीट केलं आहे. कार्तिकने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''इतक्या मनोरंजक, रोमहर्षक दिवसाच्या खेळानंतर मला नक्कीच असं वाटतं ही याहून वेगळी आणि भारी हेडलाईन करत आली असती, इंग्लंड क्रिकेट. पंतच्या शतकासह आणि दोन्ही संघाची खेळी उत्तम होती.'






 


पंतवर कौतुकाचा वर्षाव


प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे एकीकडे आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतत असताना पंतने जाडेजासोबत भारताचा डाव सांभाळला. सोबतच आपलं शतकही पूर्ण करत पुन्हा एकदा कसोटी सामन्यात टी20 प्रमाणे फलंदाजी केली. 89 चेंडूत पंतने शतक पूर्ण केलं. 89 चेंडूत त्याने 15 चौकार आणि एका षटकरासह 100 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर 146 धावांपर्यंत अगदी तुफानी फलंदाजी पंतने केली पण जो रुटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीने त्याला झेलबाद करत तंबूत धाडलं. पण या मोक्याच्या क्षणी पंतने ठोकलेल्या शतकाने सर्वांचीच मनं जिंकली. ज्यामुळे सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद, इरफान पठाण, बीसीसीआय सचिव जय शाह आदींचा समावेश आहे. परदेशी खेळाडू राशिद खान, मायकल वॉ अशा अनेकांनी देखील पंतचं कौतुक केलं आहे.


हे देखील वाचा-