James Anderson : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंघम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 416 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी खेळाला सुरुवात केली आहे. दरम्यान भारताचा डाव 416 धावांवर आटोपण्यात मोलाची कामगिरी केली इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson). इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स जेम्सनेच घेतल्या असून एका डावात त्याने 5 विकेट्स नावे केल्या. ज्यासोबत एक खास विक्रमही त्याने नावावर केला आहे. एका डावात 5 विकेट्स घेणारा अँडरसन सर्वात वयस्कर गोलंदाज बनला आहे.


सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. त्यांनी सुरुवातही उत्तम केली अँडरसनच्या दमदार गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज गुडघे टेकत होते. पण भारताकडून ऋषभ पंत (146) आणि रवींद्र जाडेजा (104) यांच्या शतकामुळे 416 धावा स्कोरबोर्डवर लागल्या. पण अँडरसनने मात्र सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. यामध्ये भारताचे सलामीवीर गिल, पुजारा तसंच श्रेयस अय्यर, जाडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. जेम्सने 21.5 ओव्हरमध्ये 60 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याने 39 वर्षे 337 दिवसांचा असताना कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. इतकं वय असताना अशी कामगिरी याआधी कोणीच केली नव्हती. आधी हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या ज्योफ चुब यांच्या नावावर होता. त्यांनी 1951 मध्ये ही कामगिरी केली होती.  


असा पार पडला भारताचा पहिला डाव


सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानुसार इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचे सर्व आघाडीचे फलंदाज एक-एक करत तंबूत परतले. सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच पॅव्हेलियनचा रस्ता धरला. 100 धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले होते. त्याचवेळी उपकर्णधार ऋषभ पंतने स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या मदतीने भारताचा डाव सावरला. पंत आणि जाडेजाने यांनी सहाव्या गड्यासाठी 222 धावांची दमदार भागिदारी केली. त्यानंतर दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली असून पंतने 146 तर जाडेजाने 104 धावा केल्या. त्यानंतर शमीने 16 धावा केल्या असून कर्णधार बुमराहने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 416 धावा पहिल्या डावात केल्या आहे. ज्यानंतर आचता इंग्लंडचे फलंदाज पहिला डाव खेळत आहेत.


हे देखील वाचा-