Cricket World Cup Coincidence  : भारतात होत असलेला विश्वचषक न्यूझीलंड जिंकणार...? होय विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अजब योगायोग जुळून आला आहे. डेवेन कॉनवे याने विश्वचषकातील पहिले शतक ठोकले अन् न्यूझीलंडच्या विश्वविजयाची स्क्रिप्ट लिहिली. होय... मागील 4 विश्वचषकाचा इतिहास पाहता यंदा न्यूझीलंड विश्वचषकावर नाव कोरणार... असे म्हटल्यास वावगं वाटायला नको. 2007 च्या विश्वचषकापासून ज्या संघाने पहिले शतक ठोकले, त्या संघाने चषकावर नाव कोरले आहे. 


2007 पासून सुरु झाला अजब योगायोग - 


मागील 16 वर्षांपासून जो संघ विश्वचषकात पहिले शतक ठोकतो, तो चॅम्पियन होतो, असाच योगायोग जुळून आला आहे. 2007 मध्ये रिकी पाँटिंगने विश्वचषकातील पहिले शतक ठोकले होते. 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजय चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर 2011 मध्ये टीम इंडियाचा सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवान याने विश्वचषकातील शतक ठोकले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेचा पराभव करत भारताने चषक उंचावला होता. 28 वर्षांनंतर भारतीय संघ विश्वविजेता झाला होता. योगायोग इथेच संपत नाही.. 2015 आणि2019 च्या विश्वचषकातही असेच घडले होते. 


2015 च्या विश्वचषकातही असाच योगायोग पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या ऑरोन फिंच याने 2015 च्या विश्वचषकातील पहिले शतक ठोकले. त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करत चषकावर नाव कोरले. 2019 च्या विश्वचषकातही यजमान इंग्लंडच्या जो रुट याने पहिले शतक ठोकले होते. अयॉन मार्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत चषक उंचावला. आता 2023 च्या विश्वचषक न्यूझीलंडच्या डेवेन कॉनवे याने शतक ठोकले आहे. 


न्यूझीलंड पहिल्यांदाच विश्वचषक उंचवणार ?


2007 पासून सुरु असलेल्या योगायोग यंदाही कायम राहणार का? जर तो योगायोग पुन्हा झाला तर यंदा न्यूझीलंड चषकावर नाव कोरणार, हे नक्कीच.. न्यूझीलंडने विश्वचषकात अनेकदा फायनलपर्यंत धडक मारली आहे. पण न्यूझीलंडला विश्वचषक उंचावता आला नाही. पण यंदा कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंडच्या विजयाचे दार उघडले आहे.  


सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय -


सलामीचा डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं झळकावलेल्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं आयसीसी वन डे विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडनं सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा नऊ विकेट्स आणि ८२ चेंडू राखून धुव्वा उडवला. न्यूझीलंडनं या विजयासह गत विश्वचषकाच्या फायनलमधल्या तांत्रिक पराभवाचा वचपा काढला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला नऊ बाद २८२ धावांत रोखलं होतं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं दुसऱ्या विकेटसाठी २७३ धावांची अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉनवेनं १९ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १५२ धावांची, तर रवींद्रनं ११ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद १२३ धावांची खेळी उभारली. त्याआधी, न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं तीन, तर मिचेल सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.