ENG Vs NZ Match Highlights: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात गत उपविजेत्या न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला. अहमदाबादच्या स्टेडिअवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ विकेट आणि 82 चेंडू राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आधी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले, त्यानंतर फलंदाजांनी इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. इंग्लंडने दिलेले 283 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 9 विकेट आणि 82 चेंडू राखून सहज पार केले. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज डेवेन कॉन्वे याने दीडशतक ठोकले, तर युवा फलंदाज रचित रविंद्र याने वादळी शतकी खेळी केली. 


न्यूझीलंडने वचपा काढला -


विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव करत न्यूझीलंडने 2019 चा वचपा काढला. 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत चषक उंचावला होता. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. पण सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. त्यानंतर इंग्लंडचे चौकार जास्त असल्यामुळे त्यांना विजेते घोषीत करण्यात आले. हाच पराभव न्यूझीलंडच्या प्रत्येकाच्या मनाच सल करुन बसला होता. आता या पराभवाची परतफेड न्यूझीलंडने केली आहे.






कॉन्वे-रविंद्रचा शतकी तडाखा


इंग्लंडने दिलेल्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाच्या अवघ्या दहा धावा झाल्या तेव्हा सलामी फलंदाज विल विंग शून्यावर तंबूत परतला होता. त्यामुळे गतविजेते न्यूझीलंडवर भारी पडणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. पण युवा फलंदाज रचित रविंद्र याने डेवेन कॉन्वे याला चांगली साथ दिली. दोघांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी 273 धावांची विक्रमी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. 






डेवेन कॉन्वे याने 121 चेंडूत वादळी 152 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये कॉन्वे याने तीन षटकार आणि 19 चौकार लगावले. तर रचित रविंद्र याने 96 चेंडूत झंझावाती 123 धावांची शतकी खेळी केली. या शतकी खेळीत रचित रविंद्र याने 11 चौकार आणि पाच षटकार ठोकले. रचित आणि कॉन्वे यांच्या वादळी फलंदाजीपुढे इंग्लंडच्या गोलंदाजांनी लोटांगण घेतले होते. इंग्लंडचा एकही गोलंदाज या जोडीपुढे टिकला नाही.  ख्रिस वोक्स, मार्क वूड, मोईन अली, अदिल रशीद लियाम लिव्हिंगस्टोन सर्वांचाच समाचार घेतला. इंग्लंडकडून फक्त सॅम करन याला एकमेव विकेट मिळाली.