Lakshya Sen Won Gold Medal : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा 20 वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला मात देत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 20 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 57 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे. 


लक्ष्य सेन आणि यॉन्ग यांच्यातील सामना अत्यंत रोमहर्षक असा झाला. सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू अगदी अटीतटीची टक्कर देत होते. पहिल्या सेटमध्ये यॉन्गने केवळ दोन गुणांच्या फरकाने 19-21 ने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. पण दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं जबरदस्त पुनरागमन करत एकतर्फी विजय मिळवला. 21-9 अशा फरकाने लक्ष्यनं सेट जिंकत सामन्यात 1-1 ची आघाडी घेतली. ज्यानंतर अखेरचा निर्णयाक सेट कमालीचा चुरशीचा झाला. लक्ष्य आघाडीवर असतानाही यॉन्ग त्याचा पाठलाग करतच होता. पण अखेर यॉन्ग 16 गुणांवर असताना लक्ष्यनं 21 गुण पूर्ण करत सेट आणि सामना जिकंत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 






सिंधूनेही मिळवलं GOLD


महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध (Michelle Li) विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक घातलंय. कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच पीव्ही सिंधूनं आक्रमक खेळी दाखवली. पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरा सेटही पीव्ही सिंधूनं 21-13 च्या फरकानं जिंकून सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. 


भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी


सुवर्णपदक- 20
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन


रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.


कांस्यपदक- 22
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री


हे देखील वाचा-