क्रिकेटच्या मैदानात नमाज अदा करणारा पाकिस्तानी संघ आपण अनेकदा पाहिला. 2011 साली भारताने जिंकलेल्या विश्वचषकादरम्यान धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करत पाकिस्तानच्या अख्ख्या संघाला मैदानातच नमाज अदा करु दिली जाते. तर मग देशप्रेमापोटी धोनीला लष्कराच्या बोधचिन्हाचे ग्लोव्ह्ज घालण्यास का रोखलं जातंय? प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी ट्वीट करत आयसीसीच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं.
अख्ख्या पाकिस्तानी टीमने क्रिकेटच्या मैदानात नमाज अदा करत ज्यू आणि ख्रिश्चनांना बदनाम करणं आयसीसीला चालतं, पण महेंद्रसिंह धोनीचे प्रतिकात्मक ग्लोव्हज चालत नाहीत. धोनीने आपल्या ग्लोव्ह्जचा कुठेही गवगवा केला नाही. त्याचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा राजकारणासाठी केला नाही. केवळ जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धोनीचं हे निर्मळ पाऊल आहे. त्यामुळे जशा पाकिस्तानच्या धार्मिक भावनांची जपणूक होते, तशी धोनीच्या राष्ट्रभक्तीचीही जपणूक झालीच पाहिजे.
'धोनी किप दी ग्लोव्हज' असं म्हणत सारा भारत माहीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. बॅज असलेलेच ग्लोव्ह्ज धोनीला वापरु द्यावे म्हणून बीसीसीआय आयसीसीकडे परवानगी मागणार आहे.
MS Dhoni gloves | धोनीचा बॅज आयसीसीला का खटकतोय? | माझा विशेष
ग्लोव्ह्ज, लोगो आणि आयसीसीचे नियम
उत्पादकांचे दोन डिझाईन लोगो वापरण्यास आयसीसीची अनुमती
राष्ट्रीय लोगो, व्यापारी लोगो, इव्हेंट लोगो, चॅरिटी लोगो प्रिंट करण्यासही परवानगी
धोनीच्या ग्लोव्ह्जवरील लोगो यापैकी कोणत्याही प्रकारात बसत नसल्याने आयसीसीचा आक्षेप
ग्लोव्ह्जबद्दल आयसीसीने घेतलेला आक्षेप फुसका बार ठरण्याची चिन्हं आहेत. कारण धोनीच्या ग्लोव्ह्जवरच्या बॅजवर बलिदान हा शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही. तसंच लष्कराच्या अधिकृत लोगोप्रमाणे धोनीच्या बॅजची रंगसंगतीही नाही. धोनीच्या ग्लोव्हजवरील बॅज हा आयसीसीसाठी फक्त नियमांचा विषय असला, तरी 130 कोटी भारतीयांसाठी तो राष्ट्रभक्तीचा विषय आहे.
महेंद्रसिंग धोनी जेवढा मैदानावरच्या खेळासाठी ओळखला जातो तेवढाच त्याच्या देशप्रेमासाठी.लेफ्टनंट कर्नल असलेल्या महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोज युनिटबद्दल असलेल्या आदरापोटी ग्लोव्हजवर बॅज ठेवले आहेत. आता आयसीसी धोनीच्या ग्लोव्ह्जसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे क्रीडा जगतासह संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे.