Irani Cup 2023 : मध्य प्रदेश क्रिकेट संघ आणि 'रेस्ट ऑफ इंडिया' संघात यांच्यात नुकताच पार पडलेला इराणी चषक स्पर्धेत 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाने दमदार असा विजय मिळवला आहे. 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाने इराणी कपमध्ये रणजी ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन संघ मध्य प्रदेशचा 238 धावांनी पराभव केला. मागच्या वेळीही 'रेस्ट ऑफ इंडिया'नेच हा चषक जिंकला होता. त्यावेळचा रणजी चॅम्पियन संघ सौराष्ट्रचा पराभव झाला होता.
इराणी चषक 2023 मध्ये 'रेस्ट ऑफ इंडिया'चा कर्णधार मयांक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. येथे, अभिमन्यू इश्वरन (154) आणि यशस्वी जैस्वाल (213) यांच्या अप्रतिम खेळीमुळे 'रेस्ट ऑफ इंडिया'ने पहिल्या डावात 484 धावा केल्या. यानंतर मध्य प्रदेशच्या यश दुबेने (109) शतक झळकावताना फॉलोऑन पुढे ढकलला. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 294 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे 'रेस्ट ऑफ इंडिया'ला 190 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर 'रेस्ट ऑफ इंडिया'च्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने (144) पुन्हा एकदा दमदार खेळी करत शतक झळकावलं आणि संघाला 246 धावांपर्यंत नेलं. अशाप्रकारे मध्य प्रदेशला विजयासाठी 437 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात हिमांशू मंत्री (51) आणि हर्ष गवळी (48) यांनी थोडा संघर्ष केला पण सामन्याच्या शेवटच्या दिवशी मध्य प्रदेशचा संपूर्ण संघ 198 धावांत गारद झाला. अशाप्रकारे 'रेस्ट ऑफ इंडिया'च्या संघाने मध्य प्रदेशचा 238 धावांनी पराभव करत ईराणी कप जिंकला.
यशस्वी जैस्वाल ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'
यशस्वी जैस्वालला त्याच्या 213 आणि 144 धावांच्या खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात 259 चेंडूत 213 धावा केल्या. यादरम्यान त्याने 30 चौकार आणि 3 षटकार मारले. चमकदार फलंदाजी करताना त्याने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला. इराणी चषकात एका सामन्यात द्विशतक आणि एक शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या सामन्यात 'रेस्ट ऑफ इंडिया'कडून पुलकित नारंगने 6 तर मुकेश कुमार आणि नवदीप सैनीने 4-4 विकेट घेतल्या. तर मध्य प्रदेशकडून आवेश खानने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.
हे देखील वाचा-