(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुजारा, रहाणेवर टांगती तलवार; कसोटी संघातून बाहेर होण्याची शक्यता
जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चेतेश्वर पुजार आणि अजिंक्य रहाण या दोघांवर टांगती तलवार आहे.
मुंबई : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय कसोटी संघात बदलाची अटकळ बांधली जात आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देखील पराभवानंतर संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन दिग्गज खेळाडूंवर टांगती तलवार आहे.
वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी राजीनाम्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हेच भारतीय संघाच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळली आहे. पण चेतेश्वर पुजाराने मागील 18 सामन्यात एकही शतकी खेळी केलेली नाही. याशिवाय चेतेश्वर पुजाराला स्लो स्ट्राईक रेटमुळेही टीकेचा धनी व्हावं लागतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पुजाराने खातं उघडण्यासाठी 35 चेंडू खेळून काढले.
विराट कोहली म्हणाला की, "आम्ही मागील काही वर्षांपासून जगातील सर्वात चांगला संघ म्हणून नावारुपाला आलोय. आम्ही आमच्या संघाचं रँकिंग खाली जाताना पाहू शकत नाही. आम्हाला खेळानुसा बदल करण्याची गरज आहे. लवकरच आम्ही मोठे निर्णय घेऊन. बदलासाठी एक किंवा दोन वर्षांची वाट पाहावी एवढा वेळ आमच्याकडे नाही."
केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता
विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट आहे की, चेतेश्वर पुजाराशिवाय अंजिक्य रहाणेच्या जागेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मेलबर्न कसोटीत शतक करणारा अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरोधात मोठी खेळी करण्यास अपयश ठरला आहे.
एका वृत्तानुसार संघ व्यवस्थापनाला आता तरुण खेळाडूंना जास्त संधी द्यायची आहे. याशिवाय केएल राहुलचा शानदार फॉर्म पाहता आता भारतीय संघ त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी देऊ शकतो. याशिवाय हनुमा विहारीलाही आता जास्तीत जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे.