मोठी बातमी... ! विश्वचषकासाठी बेन स्टोक्सने निवृत्ती मागे घेतली
Ben Stokes : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ सज्ज आहे. स्टोक्सने निवृत्ती मागे घेतली आहे.
Ben Stokes reversed his ODI retirement : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ सज्ज आहे. इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली आहे. आयसीसीने याबाबतचे वृत्त दिलेय. विश्वचषकाआधी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरोधात वनडे मालिका खेळणार आहे. बेन स्टोक्स न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेपासून वनडे मध्ये पुनरागमन करणार आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होईल. या वनडे मालिकेसाठी बेन स्टोक्स (Ben Stokes) याची इंग्लंड संघात निवड केली गेली आहे. वर्कलोडमुळे स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आता आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.
The big man is back 🔥
— England Cricket (@englandcricket) August 16, 2023
Luke Wright on the sensational return of Ben Stokes to ODI cricket... 👇
2019 च्या विश्वचषकात केली होती कमाल -
2019 चा एकदिवसीय विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले होते. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात बेन स्टोक्सचा मोलाचा वाटा होता. स्टोक्सने 66.43 च्या सरासरीने 465 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही सात विकेट्स घेतल्या. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत स्टोक्स चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत प्रभावी ठरू शकतो. इंग्लंड व्यवस्थापनालाही याची चांगलीच कल्पना आहे आणि त्यामुळेच व्यवस्थापन स्टोक्सच्या पुनरागमनात गुंतले आहे. मात्र, अंतिम निर्णय स्टोक्सचं घेणार आहे.
🚨 JUST IN: England star reverses retirement in the lead-up to the @cricketworldcup as ECB announce squad for New Zealand ODI series!
— ICC (@ICC) August 16, 2023
Details 👇
बेन स्टोक्सची वनडेमधील कामगिरी कशी राहिली ?
अष्टपैलू बेन स्टोक्स याने इंग्लंडसाठी 105 वनडे सामने खेळले आहेत. यामधील 90 डावात स्टोक्स याने 2924 धावा केल्या आहेत. 102 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तीन शतके आणि 21 अर्धशतके स्टोक्सने झळकावली आहेत. गोलंगदाजीत स्टोक्स याने 88 डावात 74 विकेट घेतल्या आहेत. 61 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
इंग्लंडसाठी का महत्वाचा आहे स्टोक्स ?
इंग्लंडचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट म्हणतात की, बेन स्टोक्स फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट आहे, पण गोलंदाजीतही तो सक्षम आहे. त्यामुळे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने इंग्लंडकडून खेळावे अशी आमची इच्छा आहे. संपूर्ण अॅशेस मालिकेत आम्ही बेन स्टोक्सला पाहत राहिलो, त्याने उत्तम कामगिरी केली. मागील अनेक वर्षे तो सातत्याने हे काम करत आहेत. बेन स्टोक्ससारखे खेळाडू वनडे फॉरमॅटमध्ये एक्स फॅक्टरसारखे ठरतात. त्यामुळे आमच्यासाठी बेन स्टोक्स महत्वाचा आहे.
विश्वचषक कधीपासून -
भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.