कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेतली. दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीनंतर सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरु लागल्या आहेत. परंतु राजभवनशी संबंधित सूत्रांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं.


या भेटीनंतर राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "आज राजभवनावर बीसीसीआयचे अध्यक्ष 'दादा' सौरव गांगुली यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. गांगुली यांनी देशातील सर्वात जुनं ईडन गार्डन्स मैदान पाहण्याचं आमंत्रण दिलं होतं, जे स्वीकारलं आहे."





बीसीसीआय अध्यक्ष बनल्यापासूनच गांगुलींच्या भाजप प्रवेशाची चर्चा
बीसीसीआयचे अध्यक्ष बनल्यानंतरच सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली होती. परंतु गांगुली यांच्याकडून कधीही याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.


पुढील महिन्यात 12 जानेवारीला स्वामी विवेकानंतर यांच्या जयंतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पश्चिम बंगाल दौरा आहे. या दौऱ्यात भाजपचे अनेक नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. याच निमित्ताने सौरव गांगुलीही भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे.


सौरव गांगुली भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?
दरम्यान सौरव गांगुली हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. "बंगालचा भूमीपुत्रच पश्चिम बंगाचा पुढील मुख्यमंत्री असेल," असं वक्तव्य अमित शाह यांनी आपल्या कोलकाता दौऱ्यामध्येच केलं होतं. अमित शाह ज्या भूमिपुत्राबद्दल बोलत आहेत ते सौरव गांगुलीच आहेत का अशी अटकळ बांधली जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या वैशाली दालमिया यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. वैशाली दालमिया सौरव गांगुली यांच्या निकटवर्ती समजल्या जातात. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ममता बॅनर्जी यांना बाहेरच्या म्हटल्याने दालमिया यांनी आक्षेप नोंदवला होता.


बंगालमध्ये निवडणुकीआधी राजकीय हालचाली वाढल्या
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे बंडखोड शुभेंदू यांच्यासह दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्या.


भाजपकडून बंगालमध्ये निरीक्षकांची नियुक्ती
कोलकाता विभागासाठी भाजपने सोवन चॅटर्जी यांची निरीक्षक आणि देबजीत सरकार यांची संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. बैसाखी बॅनर्जी आणि संकुदेब पांडा यांना सह-संयोजक बनवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी इतर जिल्ह्यातही निरीक्षक आणि संयोजक नियुक्त केले आहेत.


Sourav Ganguly | सौरव गांगुली राजकीय मैदानात? पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण