मेलबर्न : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने बॉक्सिंग डे कसोटीत आपली पकड मजबूत केली आहे आहे. भारताचा पहिला डावा 326 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाला पहिल्या कसोटीत 131 धावांची आघाडी मिळवण्यात यश आलं आहे. लिएनने जसप्रीत बुमराची विकेट घेऊन टीम इंडियाला 326 धावांवर गुंडाळलं. भारतीय संघ ऑलआऊट झाल्यासोबतच तिसऱ्या दिवसाचा उपाहार देखील झाला. ऑस्ट्रेलियाचा संघ उपाहारानंतर आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करेल.


टीम इंडियाने पहिल्या डावात 131 धावांची आघाडी मिळवून आपलं पारडं अतिशय मजबूत केलं आहे. भारताकडून अजिंक्य रहाणेने 112 धावांची खेळी रचली. तर रवींद्र जडेजाने 57 धावा करुन टीम इंडियाला 326 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि लिएन यांना प्रत्येकी तीन विकेट्स मिळवण्यात यश आलं. तर कमिन्सला दोन आणि हेजलवूडला एक विकेट मिळाली.


त्याआधी तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला मोठं यश मिळालं. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे112 धावांवर रन आऊट होऊन परतला. तर दुसरीकडे रवींद्र जाडेजा ने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पंधरावं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जाडेजा आणि रहाणे यांनी सहाव्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीमुळेच भारताला 131 धावांची आघाडी मिळवता आली.