Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुन्हा एकदा संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत (IND vs AUS) दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) जागी संजू सॅमसनला (Sanju Samson) संघाचा भाग बनवण्यात येईल, अशी अपेक्षा होती, मात्र अजूनही तसं झालेलं नाही. शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या जागी कोणतीच रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही.


वनडेमध्ये संजूचे आकडे उत्कृष्ट 


एकदिवसीय मालिकेला 17 मार्च, शुक्रवारपासून सुरुवात होणार असून, पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेसाठी संजू सॅमसनचा संघात समावेश होऊ शकतो. सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सरासरी 66 आहे, मात्र पुन्हा एकदा त्याच्याकडे बीसीसीआयने दुर्लक्ष केलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यापासून संघात दाखल होणार आहे.


चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान अय्यर दुखापतग्रस्त


अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला. यानंतर तो पहिल्या डावात फलंदाजीलाही आला नाही. दुखापतीनंतर त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले. स्कॅन अहवालानुसार, ही त्याच्या पाठीच्या दुखापतीची पुनरावृत्ती आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. कसोटी मालिकेपूर्वीही अय्यर दुखापतीमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेथे त्यांनी 15 दिवस पुनर्वसन केले. अय्यर पहिल्या कसोटीला मुकला आणि दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीपासून संघात सामील झाला. विशेष म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे, अशा परिस्थितीत अय्यरबाबत घाई करता येणार नाही.


कसा आहे भारतीय संघ?


भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


संजू श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघात होता


जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत संजूला संघाचा भाग बनवण्यात आले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. मात्र, त्या सामन्यात त्याला केवळ 5 धावाच करता आल्या होत्या. यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो पुढील दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होता. विशेष म्हणजे बीसीसीआयने संजूच्या हेल्थबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे का? की त्याची निवड न करण्यामागे आणखी काही कारण आहे, त्याबाबत काहीही समोर आलेले नाही.


हे देखील वाचा-