IND vs AUS, ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. ही मालिका 2-1 अशी जिंकण्यात टीम इंडियाला यश आलं. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर आहे. दोन्ही देशांदरम्यान 17 मार्चपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. वनडे मालिकेतही टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) हरवण्याचा प्रयत्न करेल. कांगारुंविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची कामगिरी तशी फार खास नव्हती. ऑस्ट्रेलियाने कडवी झुंज दिली असल्याने वनडे सामनेही रंगतदार नक्कीच होऊ शकतात.


17 मार्चपासून सुरु होणार सामने


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे आणि तिसरा आणि अंतिम सामना 22 मार्च रोजी चेन्नईत खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.


कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सर्व एकदिवसीय सामन्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास, टीम इंडियावर कांगारुंचे पारडे जड आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत 143 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले असून भारताने 53 सामने जिंकले आहेत. तर 10 एकदिवसीय सामन्यांचा निकाल लागला नाही.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा


भारताने जिंकली कसोटी मालिका


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया  (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे. कारण सामन्यासाठी मिळणाऱ्या पाचही दिवसांचा खेळ संपल्यावरही निकाल समोर न आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. पण मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफी खिशात घातली.


हे देखील वाचा-