Australia ODI Captain: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 17 मार्चपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत पॅट कमिन्सही (Pat Cummins) अनुपस्थित राहणार आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सांभाळणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 (Border Gavaskar Trophy) च्या पहिल्या दोन कसोटीनंतरच पॅट कमिन्स मायदेशी परतला होता. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला चार सामन्यांची कसोटी मालिका अर्ध्यातच सोडून मायदेशी परतावं लागलं होतं. गेल्या आठवड्यातच त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत कमिन्सने आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले की, "पॅट परतणार नाही. काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे पुढचे काही दिवस पॅटने आपल्या कुटुंबियांसोबतच वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची सहानुभूती पॅट आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहे." यावरुन आता स्टिव्ह स्मिथच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेचा कर्णधार असेल, हे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे.


पॅट कमिन्सने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्येच सोडल्यानंतर स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. तिसऱ्या कसोटीत त्याने आपल्या संघाला विजय मिळवून देत मालिकेत दमदार पुनरागमन केलं. मात्र, या मालिकेतील शेवटची कसोटी अनिर्णित राहिली आणि ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांची मालिका 1-2 अशी गमावली. 


पॅट कमिन्सने गेल्या वर्षीच वनडे संघाचं कर्णधारपद स्वीकारलं


गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर पॅट कमिन्सकडे वनडे सामन्यांच्या संघाची जबाबदारी देण्यात आली होती. कसोटी कर्णधारपदाचा जबरदस्त विक्रम पाहता, कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामन्यांसाठीच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र, त्याला आतापर्यंत केवळ दोनच एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पॅटने इंग्लंडविरुद्ध प्रथमच एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व केलं होतं.


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची सरशी 


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया  (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे. कारण सामन्यासाठी मिळणाऱ्या पाचही दिवसांचा खेळ संपल्यावरही निकाल समोर न आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. पण मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफी खिशात घातली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरने वाढवली कोलकाताची धाकधूक; IPL 2023 मध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह