Bangladesh Protest Dhaka Sheikh Hasina: राखीव जागांच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमधील हिंसक निदर्शनांची (Bangladesh Protests) धग इतकी वाढली की सोमवारी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना पदाचा राजीनामा देऊन तातडीने देश सोडावा लागला. यानंतर भारताकडे पलायन करण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली.


बांगलादेशमधील हिंसाचार अजूनही सुरुच आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून आता अल्पसंख्याक हिंदूंसह शेख हसीनांच्या अवामी लीगच्या समर्थक आणि त्यांच्या कार्यालयांना लक्ष करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफी मुर्तझासोबत हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं घरही पेटवून दिल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र लिटन दासचं घरावर कोणताही हल्ला झालेला नाही, असं स्थानिक लोकांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे. 


पोस्टमध्ये नेमकं काय?


बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटन दासचे घर जाळल्याची बातमी पसरली. मात्र, X वर पोस्ट लिहिणाऱ्या एका बांगलादेशी पत्रकाराने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे. लिटन दाससोबत अशी घटना घडली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. लिटन दासच्या घरावर नाही, तर मशरफी मुर्तझाच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लिटन दास हा बांगलादेशचा प्रमुख क्रिकेटपटू आहे. बांगलादेशसाठी त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत.






मशरफी मुर्तझाच्या घराची तोडफोड-


बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू मशरफी मुर्तझा हे देखील शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे खासदार म्हणून निवडून आले होते. आंदोलकांनी मशरफी मुर्तझाच्या घरावर हल्ला केला. तसेच घराची तोडफोड आणि लूटमार करत आग लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. मशरफी मुर्तझा हे बांगलादेशातील नराइल-2 मतदारसंघाचे खासदार आहेत, जे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. 


मशरफी मुर्तझा सलग दुसऱ्यांदा खासदार-


मशरफी मुर्तझा या वर्षी सलग दुसऱ्यांदा नरेल-२ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मशरफी मुर्तझाच्या घराला आग लावण्याबरोबरच आंदोलकांनी जिल्ह्यात असलेल्या अवामी लीगच्या कार्यालयालाही आग लावली. याच जिल्ह्यात पक्षाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. नारायणगंज-4 मतदारसंघात लूटमार आणि अवामी पक्षाशी संबंधित अनेक नेत्यांच्या घरांची तोडफोड झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या अधिकृत निवासस्थानाची लूट आणि तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य एवढे आहे की हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा पाडण्यात आला आहे.


संबंधित बातमी:


Bangladesh Protests: बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घराला लावली आग; आंदोलक आक्रमक, ढाक्यात हिंसक वळण