Pakistan vs Bangladesh 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आहे. ज्यामध्ये रावलपिंडीच्या मैदानावर पाकिस्तानने माती खाल्ली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला.  बांगलादेशने रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आहे.  


पाच दिवस चाललेल्या या सामन्यातील विजयानंतर बांगलादेशने या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला बांगलादेशकडून कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (Bangladesh Script Historic Maiden Test Win Vs Pakistan)






कसा होता कसोटी सामना?


पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने 448 धावांवर 6 विकेट गमावून डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने 141 आणि मोहम्मद रिझवानने 171 धावा केल्या. 


यानंतर बांगलादेशचा संघ 565 धावांवर ऑलआऊट झाला. मुशफिकुर रहीमने साडेआठ तासांहून अधिक काळ चाललेल्या मॅरेथॉन खेळीत 341 चेंडूंत एक षटकार आणि 22 चौकार मारून बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला 146 धावांवर ऑलआउट केले आणि त्यांना विजयासाठी केवळ 30 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने 6.3 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला.


'या' कारणामुळे पाकिस्तानचा झाला पराभव...


या सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानने 448 धावांवर डाव घोषित केला होता. जेव्हा त्यांना आणखी मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानने तसे केले नाही आणि कर्णधार शान मसूदने डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही सतरावी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने पहिला डाव घोषित केला आणि तरीही पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानसोबत हे तिसऱ्यांदा घडले आहे. याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले. पाकिस्तानने 12 कसोटी सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता, मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बांगलादेशने 14 वा कसोटी सामना जिंकला.  


हे ही वाचा :


'एका रात्रीत लॉकडाऊन, नोटाबंदी, मग फाशी का नाही...' महिला अत्याचारावरुन टीम इंडियाच्या खेळाडूच्या पत्नीचा संताप


Joe Root : जो रूटने एका दगडात मारले दोन पक्षी; 'क्रिकेट'च्या देवाचा विश्वविक्रम धोक्यात