Shakib Al Hasan Murder Allegation Case Details : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन सध्या पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला आहे त्यात बांगलादेशने बाजी मारली. या सामन्यादरम्यान शाकिब अल हसनवर खुनाचा आरोप असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी येताच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. मग शाकिबवर कोणाच्या हत्येचा आरोप होता? यामुळे शाकिबची कारकीर्द संपुष्टात येईल का? संपुर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया....


शाकिब अल हसनसोबत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही हत्येचा आरोप आहे. रफीकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने या खुनाचा गुन्हा दाखल केला होता, ज्याचा 17 वर्षीय मुलगा रुबेल बांगलादेशातील निषेधादरम्यान गोळ्या घालून ठार झाला होता. ढाक्याच्या एदाबर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती, ज्यामध्ये 154 लोकांची नावे आहेत आणि शाकिबला 28 वा आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, रफिकुल इस्लामच्या वकिलांनी शकीबला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून काढून टाकण्याची मागणी केली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये शाकिबवर क्रिकेटमधून बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.


बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी शाकिबच्या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले होते की, "पहा, एफआयआर ही फक्त पहिली माहिती आहे आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी अद्याप कोणतेही आरोप केलेले नाहीत. त्यामुळे आता कोणताही निर्णय घेणे कठीण आहे. दुसरी कसोटी 30 ऑगस्टपासून आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी आपण याबाबत काय करावे याचा विचार करू शकतो.


शाकिब अल हसन बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारमध्ये मंत्री होते. बांगलादेशातील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला. यानंतर शाकिबलाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


शाकिब अल हसनची कारकीर्द संपणार?


सध्या शाकिबवर केवळ आरोपच केले जात आहेत, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीबाबत काहीही सांगता येणार नाही. जर त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध झाले आणि त्याला शिक्षा झाली तर अशा परिस्थितीत त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. मात्र, या खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


हे ही वाचा : 


'प्रेम' म्हणजे काय? पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाची अजब पोस्ट, म्हणाली 'तो इतरांचा अपमान...'