(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?
india vs pakistan Match : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा फक्त सहा धावांनी पराभव केला.
Babar Azam on india vs pakistan Match : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लो स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा फक्त सहा धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या जवळ होता. पण भारतीय माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान खडतर झालेय. त्यांचा सुपर 8 मधील प्रवेश जर तर या स्थितीमध्ये पोहचलाय. पाकिस्तानला उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, त्याशिवाय अमेरिकाचा दोन्ही सामन्यात पराभव व्हावा लागेल, तरच पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा आहेत. त्यामुळे भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम याला राग अनावर झाला. सामन्यानंतर बोलताना बाबर आझम यानं पाकिस्तानच्या पराभवाचे कारण सांगितले.
बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं?
पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझम म्हणाला की, 'दहा षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. 120 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दहा षटकांपर्यंत आम्ही सामन्यात होतो. आमची धावगतीही उत्तम होती. पण लागोपाठ विकेट पडल्याचा आम्हाला फटका बसला. ठरावीक अंतराने विकेट पडल्यामुळे अखेरच्या षटकात जास्त धावा राहिल्या. '
120 धावांचा पाठलाग करताना प्लॅन काय होता? या प्रश्नावर बोलताना बाबर आझम म्हणाला की, आमचा प्लॅन अतिशय सिम्पल होता. स्ट्राईक रोटेट करायचं. प्रत्येक षटकात 5 ते 6 धावा करायच्या. पण आमच्याकडून निर्धाव चेंडू जास्त गेले. त्याचा दबाव वाढत गेला. परिणामी आम्ही तीन विकेट झटपट गमावल्या.
तळाच्या फलंदाजांकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवू शकत नाही. आम्हाला पॉवरप्लेमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. आम्ही 6 षटकात 40-45 धावा करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. पण आम्हाला पॉवरप्लेचा फायदा घेता आला नाही. खेळपट्टी चांगली होती, चेंडू बॅटवर चांगला येत होता. काही वेळा चेंडू उसळी घेत होता. पण ड्रॉप-इन खेळपट्टीवर असं होऊ शकतं, याचा अंदाज होताच, आम्ही एकेरी दुहेरी धावांवर भर द्यायला हवा होता, असे बाबर आझम म्हणाला.
एकूणच काय तर बाबर आझम यानं पराभवाचं खापर फलंदाजीवर फोडलं. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळेच पाकिस्तानला 120 धावांचा पाठलाग करता आला नाही. पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत आपली कामगिरी चोख बजावली.
"Played too many dot balls": Pakistan skipper Babar after loss to India in T20 WC
— ANI Digital (@ani_digital) June 9, 2024
Read @ANI Story | https://t.co/OB2FICU2kX#INDvsPAK #BabarAzam #MeninBlue #ICCT20WorldCup #cricket pic.twitter.com/NkZ0HOoK7t
सामन्याचा लेखाजोखा
न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने सलग दुसऱ्या विजायीच नोंद केली. 5 जून रोजी आयर्लंडचा पराभव केला होता. 9 जून रोजी पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरोधात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋषभ पंत याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. विराट, रोहित, सूर्या, हार्दिक, दुबे आणि जाडेजा यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडले. तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.