Steve Smith चा कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम; कुमार संगकारा, सचिन तेंडुलकरला मागे टाकलं!
ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. कसोटीमध्ये सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
Steve Smith Record : ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. वेगवान गोलंदाज हसन अलीच्या चेंडूवर चौकार मारुन स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 8,000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता.
32 वर्षीय स्टीव्ह स्मिथने 85 कसोटी सामन्यांतील 151 डावांमध्ये या विक्रमाला गवसणी घातली. त्याने कुमार संगकारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलं. संगकाराने 12 वर्षांपूर्वी 152 डावांमध्ये 8,000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. संगकाराने 2010 साली भारताविरुद्ध हा विक्रम केला होता. तर सचिन तेंडुलकरने 154 डावात 8 हजार धावा पूर्ण केल्या.
कसोटीत 8 हजार धावा करणारा स्टीव्ह स्मिथ हा जगातील 33वा आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज आहे. याआधी रिकी पॉण्टिंग (13378 धावा), अॅलन बॉर्डर (11174 धआवा), स्टीव्ह वॉ (10927 धावा), मायकल क्लार्क (8643 धावा), मॅथ्यू हेडन (8625 धावा) आणि मार्क वॉ (8029 धावा) यांनी हा टप्पा ओलांडला आहे.
स्मिथने आपल्या कारकीर्दीची सुरुवात लेग ब्रेक गोलंदाज म्हणून केली होती. 2010 मध्ये त्याने लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं होतं. हळूहळू त्याने फलंदाजीत छाप सोडली. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक बनला आहे.
स्टीव्ह स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीत 27 शतके झळकावली आहेत. कसोटीत त्याच्या फलंदाजीची सरासरी 60च्या वर आहे. सध्या तो कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि भारताचा विराट कोहली यांना टक्कर देत आहे.
सर्वात जलद 8 हजार कसोटी धावा
स्टीव्ह स्मिथ - 151 डाव
कुमार संगकारा - 152 डाव
सचिन तेंडुलकर - 154 डाव
सर गॅरी सोबर्स - 157 डाव
राहुल द्रविड - 158 डाव