Australia vs India, 5th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवासह टीम इंडियाने मालिका 3-1 ने गमावली आहे. इतकेच नाही तर आता भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे.
खरंतर, बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. या मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले. एकही फलंदाज फॉर्मात दिसला नाही. याचे परिणाम भारताला 3-1 ने गमावून भोगावे लागले. या मालिकेत टीम इंडियाने पहिला सामना जिंकला, त्यानंतर भारताच्या पदरी निराशाच आली.
ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव करत बॉर्डर गावसकर ट्रॉफीवरच कब्जा तर केला, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीटही मिळवले आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताकडून हिसकावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. टीम इंडियाने यजमानांना विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे कांगारूंनी 4 गडी गमावून पूर्ण केले. या पराभवामुळे भारताने केवळ मालिका गमावली नाही तर सलग तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधीही गमावली. आता WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला. टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात चार धावांची आघाडी होती. भारताचा दुसरा डाव 157 धावांत आटोपला आणि एकूण आघाडी 161 धावांची झाली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास (22), उस्मान ख्वाजा (41), मार्नस लॅबुशेन (6) आणि स्टीव्ह स्मिथ (4) यांचे विकेट गमावले. यानंतर ट्रॅव्हिस हेड (34*) आणि ब्यू वेबस्टर (39*) यांनी 46 धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी विराट कोहली कर्णधार होता. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर सिराजला एक विकेट मिळाली.