Points Table : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गुणतालिकेत उटलफेर, पाहा कोणत्या संघाची काय स्थिती ?
Points Table : श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजयाचे खाते उघडले आहे.
World Cup 2023 Points Table : श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजयाचे खाते उघडले आहे. तीन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. दहाव्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलिया आता आठव्या स्थानावर पोहचला आहे. तर नवखा नेदरलँड संघ दहाव्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर असणारा श्रीलंका संघ आता नवव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंका आणि नेदरलँड या दोन्ही संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा अद्याप एकाही सामन्यात पराभव झालेला नाही.
गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर -
पाकिस्तानचा पराभव करत शनिवारी भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतायी संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. पण भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे भारत टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला.
विश्वचषकात मोठा उलटफेर -
रविवारी अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान संगाने गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. अफगाणिस्तान संघाने साहेबांचा पराभव करत गुणतालिकेत मोठा फेरबदल केला आहे. साहेबांचा पराभव करत अफगाणिस्तान संघाने दहाव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडचा संघ तीन सामन्यात दोन पराभवासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. बांगलादेशचा संघ तीन सामन्यात दोन गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय -
श्रीलंकेचा पाच विकेटने पराभव करत ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले आहे. श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने पाच विकेट 35.2 षटकात पार केले. जोश इंग्लिंश आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतकी खेळी केली. मिचेल मार्श याने 51 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. जोश इंग्लिंश याने झंझावती अर्धशतक ठोकले. त्याने एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 59 चेंडूत 58 धावांची खेळी केली. लाबुशेन याने 60 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. मॅक्सवेल याने 21 चेंडूमध्ये दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. तर मार्कस स्टॉयनिस याने एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 20 धावांचे योगदान दिले.