Ind vs Aus 1st Test : पर्थ कसोटीत भारताची टॉप ऑर्डर ढेपाळली, यशस्वी 0,पडिक्कल 0 ,कोहली 5 धावा करून आऊट; कांगारूंच्या तगड्या गोलंदाजासमोर टेकले गुडघे
भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Australia vs India 1st Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा पहिला कसोटी सामना आजपासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू झाला आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाची कमान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हाती आहे. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून आज दोन खेळाडू पदार्पणासाठी सज्ज आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारतीय डावाची सुरुवात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. जैस्वाल ऑस्ट्रेलियातील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. युवा सलामीवीराला आपले खातेही उघडता आले नाही. मिचेल स्टार्कने त्याला आपला बळी बनवले. यानंतर देवदत्त पडिक्कलही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. 2 युवा फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर केएल राहुलला साथ देण्यासाठी विराट कोहली क्रीजवर आला.
कोहलीने सावध खेळण्यास सुरुवात केली आणि लवकरच आपले खाते उघडले. पण जोश हेझलवूडने कोहली आऊट केले, अतिरिक्त बाऊन्समुळे चेंडू बॅटला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाने त्याचा झेल घेतला. कोहलीला केवळ 5 धावा करता आल्या. अशाप्रकारे विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10व्यांदा जोश हेझलवूडचा बळी ठरला. कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारा हेझलवूड आता संयुक्तपणे दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांनीही प्रत्येकी 10 वेळा कोहलीला बाद केले आहे. एवढेच नाही तर हेझलवूड आता विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज
- 11 - टिम साउथी
- 10 - जोश हेझलवुड*
- 10 - जेम्स अँडरसन
- 10 - मोईन अली
विराट कोहली कसोटीत सलग पाच डावात 20 धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरला आहे. कोहलीचे शेवटचे पाच स्कोअर 5, 1, 4, 17 आणि 1 आहेत. अशाप्रकारे, 7 वर्षात प्रथमच कोहलीला असा दिवस पहावा लागला जेव्हा तो कसोटीत सलग 5 डावात 20 धावांचा टप्पा देखील पार करू शकला नव्हता.
पर्थ कसोटीत उपाहारापर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 51/4 आहे. ऋषभ पंत (10) आणि ध्रुव जुरेल (4) धावांसह खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने 2-2 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली हे आऊट झाले आहेत.
That's Lunch on Day 1 of the first #AUSvIND Test! #TeamIndia 51/4, with Rishabh Pant (10*) & Dhruv Jurel (4*) at the crease.
— BCCI (@BCCI) November 22, 2024
We will be back for the Second Session soon.
Scorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo pic.twitter.com/eMtj9MEJmX
भारताची प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.