AUS vs ENG : जो रुट- जोफ्रा आर्चरनं ऑस्ट्रेलियाला रडवलं, टी 20 स्टाईल फलंदाजी, मिशेल स्टार्कच्या मेहनतीवर पाणी
AUS vs ENG :ॲशेसमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी जो रुटनं शतक केलं. तर, मिशेल स्टार्कनं 6 विकेट घेतल्या.

AUS vs ENG ब्रिसबेन : ॲशेसमधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून ब्रिसबेन येथे सुरु झाली आहे. पहिला दिवस इंग्लंडकडून जो रुटनं गाजवला. तर, ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कनं सहा विकेट घेतल्या. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडनं 9 बाद 325 धावा केल्या आहेत. जो रुटनं कसोटीमधील 40 वं शतक झळकावलं. पहिला संपला तेव्हा जो रुट आणि जोफ्रा आर्चर यांच्यात 44 बॉलमध्ये 61 धावांची भागीदारी झाली होती.
Joe Root : जो रुटचं शतक
इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीनं 76 धावा केल्या. मात्र, बने डकेट आणि ओली पोप यांना खातं देखील उघडता आलं नाही. क्रॉली आणि जो रुट यांच्या 117 धावांच्या भागीदारीनं इंग्लंडच्या संघाला संकटातून बाहेर काढलं. हॅरी ब्रुक 31 धावा करुन बाद झाला. तर, बेन स्टोक्स जोश इंग्लिशच्या अफलातून थ्रो मुळं धावबाद झाला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जो रुटनं 135 धावंची खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियात जो रुटनं हे पहिलं शतक केलं आहे. त्याचं कसोटी करिअरमधील हे 40 वं शतक होतं. जो रुटनं पदार्पणानंतर 13 वर्षांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात शतक केलं आहे.
रुट-आर्चरनं ऑस्ट्रेलियाला रडवलं
इंग्लंडनं त्यांची नववी विकेट 264 धावांवर गमावली होती. 9 बाद 273 धावा या धावसंख्येनंतर इंग्लंडनं वेगात धावा जमवल्या. जो रुट आणि जोफ्रा आर्चर या दोघांनी तुफानी फटकेबाजी करत 5 ओव्हरमध्ये 52 धावा केल्या. जोफ्रा आर्चरनं दोन षटकारांसह 26 बॉलमध्ये 32 धावा केल्या. जो रुटसह मिळून त्यानं 10 व्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. यामुळं इंग्लंडनं 300 धावांचा टप्पा पार केला.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज मिशेल स्टार्क ठरला. मिशेल स्टार्कनं 6 विकेट घेतल्या. स्टार्कनं ॲशेसमध्ये आतापर्यंत 16 विकेट घेतल्या आहेत. स्टार्क ॲशेसमधील यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
दरम्यान, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यामुळं त्यांनी इंग्लंड विरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.




















