Asian Games 2023 India vs Sri lanka Final Cricket Match : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 116 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेच्या संघ २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात 97 धावांपर्यंत मजल मारु शकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे दिवसातील हे दुसरे सुवर्णपदक होय. 


भारताकडून तितास साधू हिने सुरुवातीला भेदक मारा केला. साधू हिने चार षटकार अवघ्या सहा धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. साधू हिने एक षटक निर्धावही फेकले. राजेश्वरी गायकवाड हिने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैदय यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. तितास साधूने तिसऱ्या षटकात श्रीलंकेला दोन धक्के दिले. अनुष्का संजीवनी हिला एका धावेवर तर विशमी गुणरत्ने हिला शून्यावर तंबूत धाडले. त्यानंत कर्णधार चमारी अटापट्टूही तितासा साधूच्या चेंडूवर बाद झाली. चमारी अटापट्टू  हिने १२ धावांचे योगदान दिले. १४ धावांत श्रीलंकेचे आघाडीचे तीन फलंदाज साधून तंबूत धाडले होते. पण त्यानंतर डिसल्वा आणि परेरा यांनी डाव सावरला. परेराे २५ तर डि सिल्वाने २३ धावांची खेळी केली. परेराला राजेश्वरी गायकवाडने तंबूत पाठवले. तर डिसल्वाचा अडथळा पूजा वस्त्राकर हिने दूर केला. ओशादी रणसिंघे हिला १९ धावांवर दिप्ती शर्माने तंबूत धाडले. 






आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 116 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानदार खेळी केली. 


भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वेगवान सुरुवात केली. पण नऊ धावांवर शेफाली वर्मा तंबूत परतली. पण त्यानंतर स्मृतीने जेमिमासोबत भारताचा डाव सावरला. दोघांनी ८० धावांची भागिदारी केली. ही जोडी खेळत होती, तोपर्यंत भारत १५० धावसंख्येपर्यंत पोहचेल असेच वाटत होते. पण स्मृती बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. 


स्मृती मंधाना हिने ४५ चेंडूमध्ये ४६ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तर जेमिमाने ४० चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये पाच चौकारांचा समावेश आहे. ही जोडी फुटल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. सुवर्णपदकाच्या सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार कमबॅक केले. रिचा घोष ९, हरमनप्रीत कौर २ पूजा २ अमनज्योत कौर एक यांना मोठी खेळी करता आली नाही.