India vs Australia, 3rd ODI : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. 27 सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. आशिया चषकात बांगलादेशविरोधात अक्षर पटेल याला दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता. पण अक्षर पटेल याच्या फिटनेसमध्ये सुधारणा नसल्याचे दिसतेय. अक्षर पटेल याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


आशिया चषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला झालेली दुखापत आता विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातूनही बाहेर राहू शकतो. अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारताच्या विश्वचषकापूर्वी अडचणी वाढल्या आहेत.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ विश्वचषकाच्या रनसंग्रामात सहभागी होणार आहे. विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात अक्षर पटेलच्या नावाचाही समावेश आहे. अशा स्थितीत तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास भारतीय संघासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते. आशिया कपच्या अंतिम फेरीत अक्षर बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली. तर ऑस्ट्रेलियाविरोधात आर. अश्विन याला स्थान दिले होते. अश्विन याने गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल बाहेर गेल्यास अश्विन अथवा सुंदर यांच्यापैकी एका खेळाडूची वर्णी लागू शकते.









दुखापतीवर मात करण्यासाठी अक्षर पटेल सध्या बेंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, अक्षर पटेल याच्या फिटनेसमध्ये बदल नाही, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. जर अक्षर विश्वचषक संघाबाहेर असेल तर त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा समावेश होऊ शकतो. 21 महिन्यांनंतर अश्विनचे वनडे संघात दमदार कमबॅक केलेय. इंदोर वनडेमध्ये अश्विन याने कठीण स्थितीत तीन विकेट घेतल्या. 


दरम्यान, विश्वचषकाच्या संघात बदल करण्यासाठी भारताकडे २८ सप्टेंबर पर्यंतचा वेळ आह. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात होणार आहे.