Ashish Shelar BCCI Election treasurer : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे आता बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खजिनदार पदासाठी शेलारांनी अर्ज भरला असल्याचं बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी सांगतिलं आहे. दरम्यान मागील काही दिवस शेलार यांचं नाव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी चर्चेत होतं. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत संयुक्त पॅनलही उतरवलं होतं. पण आता बीसीसीआय खजिनदार झाल्यास MCA अध्यक्ष म्हणून दुसऱ्या कोणाचीतरी वर्णी लागणार आहे.


आज (11 ऑक्टोबर) मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयातून जय शाह आणि आशिष शेलार एकत्र बाहेर पडतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान 18 ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार आहे. त्याआधी विविध घडामोडींना वेग आला असताना आता खजिनदार पदासाठी शेलाराचं नाव समोर येत आहे. याशिवाय राजीव शुक्ला यांनी पुन्हा उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला असून निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास शुक्ला यांनी व्यक्त केला. 




MCA अध्यक्ष कोण?


शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल एकत्रितपणे मैदानात उतरल्याने शेलार हेच एमसीए अध्यक्ष होतील, असं म्हटलं जात होतं. पण आता ते बीसीसीआय खजिनदार होण्याची शक्यता असल्याने एमसीए अध्यक्ष कोण? हा प्रश्न समोर आला आहे. अशामध्ये पवार-शेलार पॅनलनं दोन डमी अर्ज भरले होते, त्यातीलच एकजण अध्यक्ष होऊ शकतो. यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले अमोल काळे आणि सचिवपदासाठी अर्ज भरलेले अजिंक्य नाईक यांच्या नावाची चर्चा आहे.


बीसीसीआय अध्यक्ष पदासाठी रॉजर बिन्नीचं नाव चर्चेत


बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपत आल्याने आता नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान ANI सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा माजी क्रिकेटर आणि 1983 विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी पुढील बीसीसीआय अध्यक्ष होऊ शकतो.  माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआय अध्यक्ष आहेत. पण 18 ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे सौरव गांगुलीला या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. या पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी बीसीसीआयचा अध्यक्ष होऊ शकतात. बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत रॉजर बिन्नी याचं नाव आघाडीवर आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या दिग्गजांची महत्वाची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींची चर्चा झाली होती.


हे देखील वाचा-