Ashish Shelar : एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय नाईक पराभूत, आशिष शेलार यांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
Ashish Shelar : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी 107 मतांनी संजय नाईक यांचा पराभव केला. यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद अमोल काळे यांच्या निधनामुळं रिक्त झालं होतं. एमसीएच्या (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) आणि संजय नाईक (Sanjay Naik) आमने सामने होते. अजिंक्य नाईक यांनी 221 मतं मिळवत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय नाईक यांना 114 मतं मिळाली आहेत. अजिंक्य नाईक यांनी 107 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या निवडणुकीत संजय नाईक यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. अजिंक्य नाईक यांच्या विजयानंतर आशिष शेलार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आशिष शेलार यांनी अजिंक्य नाईक यांचं अभिनंदन देखील केलं आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे खेळाडू, प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि क्रिकेटसाठी झटणाऱ्या ध्येय वेड्यांंचा एक परिवार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमच्यासाठी हार -जीत महत्त्वाची नाही. हा जंटलमॅन गेम आहे, तो त्याच पध्दतीने होणे महत्त्वाचा आहे. ही खिलाडूवृत्तीने लढलेली मैत्रीपूर्ण लढत होती, ज्यामध्ये अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांचा विजय झाला. त्यांचे अभिनंदन, असं आशिष शेलार म्हणाले.
आता यापुढे आम्ही सगळे मिळून असोसिएशनसाठी काम करु, मी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे. अजिंक्य नाईक यांचा कार्यकाळ यशस्वी होईलच. आम्ही नवनवीन उत्तम खेळाडू तयार व्हावे, त्यांंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकत्रित काम करु. आमचे उमेदवार संजय नाईक यांनी सुध्दा खिलाडूपणा दाखवून लढत दिली. आता त्यांना ही मी आवाहन करेन की, आपला हा क्रिकेट परिवार आहे यापुढे सगळ्यांंनी एकत्र काम करु या, असं आशिष शेलार म्हणाले.
अजिंक्य नाईक विजयांनतर काय म्हणाले?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवला. वयाच्या 38 व्या एमसीएचे अध्यक्ष होणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. मतमोजणी पार पडल्यानंतर विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी आपल्या भावना मांडल्या. हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं ते म्हणाले. अमोल काळे यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी सहकार्य केलं त्यांचे देखील आभार मानत असल्याचं ते म्हणाले.
एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 375 मतदारांपैकी एकूण 335 मतदारांनी मतदान केलं.
संबंधित बातम्या :