Maharashtra: पालघर (Palghar) मधील निहे या ग्रामीण भाग असलेल्या तन्वी पाटील (Tanvi Patil) हिची गुजरात मधील अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघात (Maharashtra women's football Team) निवड झाली आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी तनवी ही पालघरमधील पहिली महिला फुटबॉलपटू ठरलीय. ज्यामुळं तन्वीवर कौतुकाचा आणि अभिनंदन याचा वर्षाव होतोय . 


पालघर पूर्वेला असलेल्या ग्रामीण भागातील निहे या छोट्याश्या गावातील तन्वी अरुण पाटील हिची गुजरात मधील अहमदाबाद  येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याने तीच सर्वत्र कौतुक होतंय. गुजरात मधील अहमदाबाद येथे 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघात तन्वी पाटील प्रतिनिधित्व करणार आहे. जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर तन्वीनं आपलं ध्येय गाठलंय. तन्वीनं कॉलेज जीवनात  एन.सी.सी. मध्ये सहभाग घेऊन 2018 साली दिल्लीमध्ये झालेल्या थलसेना शिबिरामध्ये देखील महाराष्ट्राच प्रतिनिधित्व केलं होतं. आता पुन्हा तन्वीला गुजरातमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीय.


अखेर कष्टाचं फळ मिळालंच
तन्वीचे वडील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात कामगार आहेत. तर, आई गृहिणी आहे. तन्वीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना देखील तन्वीने जिद्द , मेहनत , महत्वकांक्षा याच्या जोरावर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणाऱ्या महिला फुटबॉल संघात आपलं नाव निश्चित केलंय. पालघरच्या सोनपंत दांडेकर या महाविद्यालयात तन्वीच शिक्षण पूर्ण झालं. मागील चार वर्षांपासून तन्वी बोईसर मधील पीडीटीएस या मैदानात फुटबॉलचा सराव करते. तन्वीला तिच्या कष्टाचं फळ मिळालंय." ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण तरुणीनं खेळाकडे वळून महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करावं", अशी अपेक्षा तन्वीने व्यक्त केली आहे . 


खेळाकडं संधी म्हणून पाहण्याची गरज
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती यात अडकून न राहता तन्वीनं आपल्या जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलंय. तन्वीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील इतर तरुण-तरुणींनी हे आता फक्त वेळ घालवण्यासाठी खेळू नये तर या खेळाला संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. 


हे देखील वाचा-