PV Sindhu and Kidambi Srikanth Win : आज कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू कोर्टवर उतरले आहेत. यावेळी महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये पीव्ही सिंधूने तर पुरुष एकेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये किदम्बी श्रीकांत याने आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. याशिवाय त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला जोडीने देखील विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे. 


नॅशनल एग्जीबेशन सेंटरमधील बॅडमिंटन कोर्टवर रंगलेल्या सामन्यात दोन वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकणारी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू जगातील 234 नंबरची खेळाडू असणारी युगांडाची हुसीना कोबुगाबेविरुद्ध मैदानात उतरली. सामन्यात सुरुवातीपीसून सिंधूने आपलं वर्चस्व कायम ठेवलं. तिने पहिला सेट 21-10 अशा तगड्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेट आणखी चांगल्या पद्धतीने 21-9 ने जिंकत सामनाही जिंकला आणि थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.



सिंधू आधी पुरुष एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांतने श्रीलंकेच्या डुमिंडु अबेविक्रमाला मात देत विजय मिळवला. श्रीकांतने देखील सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवून ठेवलं होतं. त्यामुळे एक सोपा विजय तो यावेळी मिळवू शकला. पहिला सेट श्रीकांतने 21-9 अशा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये डुमिंडुने काहीसा चांगला खेळ दाखवला, पण किदम्बीला मात देण्यासाठी तो पुरेसा नव्हता. ज्यामुळे दुसरा सेटही श्रीकांतने 21-12 च्या फरकाने जिंकत देत उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी राउंड ऑफ 16 च्या सामन्यात मॉरिशसच्या जेमिमाह लेउंग फोर सांग आणि गनेशा मुनग्रह या जोडीला 21-2 आणि 21-4 अशा अत्यंत मोठ्या फरकाने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.


 


हे देखील वाचा-