अहमदनगर: इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेत येण्याचा टक्का वाढत असताना दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना झाडाखाली बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे. चार वर्षांपूर्वी शाळा, खोल्या पाडण्याची घाई केली गेली, मात्र शाळा बांधण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने झाडाखाली बसून मुलांना धडे गिरवावे लागण्याची वेळ आली आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही अवस्था आहे. या शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गात शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात शाळा कोसळून झालेल्या अपघातानंतर जिल्ह्यातील शाळांचा सर्व्हे केला गेला. त्यात येथील शाळा धोकादायक असल्याचा अहवाल दिला गेला आणि शाळा, खोल्या जमिनदोस्त करण्यात आल्या. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू असल्याने याकडे कोणाच लक्ष गेलं नाही. 
आता शाळा ऑफलाईन सुरू झाल्या असून शाळा पाडण्याची तत्परता दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेने शाळा पुन्हा बांधण्याची मात्र घाई केली नाही. त्यामुळे आज या चिमुकल्यांना झाडाखाली किंवा गावातील मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.


जिल्हा परिषदेच्या या शाळेत पाच शिक्षक आहेत. शिक्षकांना शिकवण्याबरोबरच मुलांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी लागते. जिल्हा परिषदेने लवकरात लवकर रखडलेले हे काम पूर्ण करण्याची गरज आहे.


राज्यात एकीकडे 'सर्व शिक्षा अभियान' सरकार राबवत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची जर अशी अवस्था असेल तर कोणते पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश देतील? सरकार आणि प्रशासनाच्या अशाच अनास्थेमुळे साहजिकच खाजगी शिक्षणसंस्थेकडे पालकांचा कल वाढला तर नवल वाटायला नको.


महत्त्वाच्या बातम्या;