Commonwealth Games 2022: भारतीय वेटलिफ्टर कमाल फॉर्ममध्ये दिसत आहेत. आजच्या दिवसात भारताने आणखी एका पदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या गुरुराज पुजारी (Gururaj Pujari) याने 61 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. एकूण 269 किलोग्राम वजन उचलत त्याने ही कामगिरी केली आहे.


इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने काही वेळापूर्वी संकेत सरगरच्या मदतीने रौप्य पदक मिळवलं. त्यानंतर आता 61 किलो वजनी गटात एकूण 269 किलोग्राम वजन उचलत गुरुराजने कांस्य पदक जिंकलं आहे.  






 



61 किलो वजनी गटात सहभागी गुरुराजने क्लीन अँड जर्कमध्ये 118 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 151 किलोग्राम वजन गुरुराजने उचलत चांगली आघाडी घेतली. त्यामुळे त्याने एकूण (118+151) 269 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा पदकासाठी प्रयत्न केला. पण अखेरच्या गुणतालिकेत तो तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. 


संकतची रौप्य पदकाला गवसणी


इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पहिलं पदक मिळवलं ते भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याच्या मदतीने. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली. संकेतने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे. यावेळी मलेशियाच्या मोहम्मद याने 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं. 


हे देखील वाचा -